Cricket News : नवी दिल्ली : बीसीसीआयने मार्च 2028 पर्यंत पाच वर्षांसाठी भारतातील 88 स्थानिक सामन्यांचे टीव्ही आणि डिजिटल अधिकार विकून एक अब्ज डॉलरची (8 हजार 200 कोटी) कमाई करण्याचे लक्ष्य आखले आहे. लिलाव सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार असून, लिलावाची पद्धत आयपीएलसारखीच राहणार आहे. ई-लिलावाद्वारे ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. Cricket News
डिजिटल अधिकारांसाठी टीव्ही अधिकारांच्या तुलनेत अधिक किंमत
2018 ते 2023 या पाच वर्षांत बीसीसीआयने 94.40 कोटी डॉलर म्हणजे जवळपास 6138 कोटी स्टार इंडियाकडून मिळविले होते. त्यामुळे प्रति सामना 60 कोटींची डिजिटल आणि टीव्ही कमाई झाली. यावेळी मात्र डिजिटल आणि टीव्ही अधिकारांसाठी वेगवेगळी निविदा मागवली जाणार आहे. आयपीएलदरम्यान मीडिया अधिकारातून बोर्डाला 48.390 कोटींची कमाई झाली होती. याचे डिजिटल अधिकार रिलायन्स आणि टीव्ही अधिकार स्टारने खरेदी केले होते.
पुढील पाच वर्षांत भारत 25 कसोटी सामने खेळेल. मागील पाच वर्षांत अनेक कसोटी सामने पाच दिवस खेळले गेले नाहीत. यातील बरेच सामने तीन दिवसांत संपले होते. ही गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे. मागच्या टप्प्याच्या तुलनेत डॉलर आणि रुपयाच्या दरात तफावत निर्माण झाली. डिजिटल अधिकारांसाठी टीव्ही अधिकारांच्या तुलनेत अधिक किंमत मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.