Breaking News : मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून अनेक राजकीय भूकंप पाहायला मिळत आहेत. मागील वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत राजकीय उलथापालथ घडवली. त्यानंतर मागच्या महिन्यात अजित पवारांनी थेट शरद पवारांशी फारकत घेत राष्ट्रवादीतच वेगळा गट निर्माण केला आणि शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील हे सुद्धा भाजपच्या वाटेवर असून, आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पुण्यात भेट घेतल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.
मी कुठेही जाणार नाही
दरम्यान, जयंत पाटील यांनी सकाळीच जे. डब्ल्यू मॅरीएट हॉटेलमध्ये अमित शाह यांची भेट घेतल्याच्या चर्चा आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच अमित शाह आणि जयंत पाटील यांच्यात भेट घडवून आणल्याचेही बोलले जात आहे. (Breaking News ) अमित शाह आणि जयंत पाटील यांच्यात तासभर खलबतं झाली असून पाटील लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु यामुळे जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर आला आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांनी माधयमांशी बोलताना आपल्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. माझी कुणाशीही भेट झाली नाही. (Breaking News ) भेट झाल्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे? असा सवाल करतानाच मी काल, आज आणि उद्या शरद पवार यांच्यासोबतच आहे, असे सांगत जयंत पाटील यांनी शाह यांना भेटल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. माझ्याबाबतच्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. मी कुणालाही भेटलो नाही. कुणाशाही माझा संपर्क झालेला नाही. अशा बातम्या पेरून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. मी कुठेही जाणार नाही. (Breaking News ) मी शेवटपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहणार आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. एखाद्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा उद्योग सुरू होणे योग्य नाही. काय झालं, काय नाही याचा अभ्यास बातमी देणाऱ्यांनी केला पाहिजे.
पाटील म्हणाले की, सकाळपासून या बातम्यांमुळे माझी करमणूक होत आहे. अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनिल भुसारा आ, मी रात्री दीड वाजेपर्यंत येथेच बसलेलो होतो. मग मी कधी पुण्याला गेलो. सकाळी, काल संध्याकाळी शरद पवार यांच्या घरी होतो. मग मी तिकडे कधी गेलो? मी त्यांना कधी भेटलो याचे संशोधन झाले पाहिजे, असे जयंत पाटील म्हणाले. (Breaking News ) ज्यांनी घरात बसून अशा बातम्या तयार केल्या, त्या तुमच्या सर्वांचा मी आभारी आहे, असा चिमटा देखील पाटील यांनी काढला. कुणी बातम्या पेरल्या याची माहिती माझ्याकडे नाही, असं सांगतानाच माझा पक्ष मोठा व्हावा हा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी जे करायचं ते मी करतोय, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली तरी जयंत पाटील हे शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले. मात्र तरीही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जयंत पाटील हे सुद्धा दादा गटात जाणार असल्याच्या बातम्या पसरत होत्या. (Breaking News ) इतकेच नव्हे तर जयंत पाटलांसाठीच एक महत्त्वाचे खाते राखून ठेवल्याची चर्चा होती. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सुद्धा एका प्रश्नाला उत्तर देताना जयंतराव आमचे तुमच्याकडेच लक्ष्य आहे, पण तुम्हीच आमच्याकडे बघत नाही, असा सूचक संदेश अजित पवारांनी दिला होता. त्यामुळे जयंत पाटील काय भूमिका घेतात हे आता पाहावं लागेल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : अमित शहा यांच्या पिंपरी दौऱ्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांना नोटिसा; काही नजरकैदेत!