तुषार सणस
Bhor Accident भोर : पुणे-सातारा महामार्गावरील किकवी गावच्या हद्दीतील पुलावर एसटी बसची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. यातील जखमीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Bhor Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली असून, राज्य परिवहन महामंडळाची बस ही पुणे येथून साताऱ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. या घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी झालेली कोंडी हटवत वाहतूक पूर्ववत केली. (Bhor Accident)
या अपघातात शंकर शिंदे (वय ४८, रा. नावेचीवडी वाई) यांचा मृत्यू झाला. सोबत रमेश चव्हाण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बसचालकांना बसचा वेग कमी ठेवण्याबाबत सूचना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत. या अपघाताची नोंद राजगड पोलीस स्टेशन किकवीमध्ये झाली असून, पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करत आहेत.