संदीप टूले
Daund News दौंड : देशभरात सध्या दलित, मुस्लिम, ख्रिश्चन या समाजावर अन्याय, अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याचा आज दौंड शहरात निषेध करण्यात आला. तिन्ही समाजातील बांधवांनी शहरातून निषेध मोर्चा काढत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यामध्ये दलित मुस्लिम व ख्रिश्चन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे ख्रिश्चन समाजातील महिलांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. (Daund News)
आंदोलकांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. या ठिकाणी झालेल्या निषेध सभेमध्ये अनेकांनी आपले प्रखर विचार मांडले. तसेच या तिन्ही समाजावर होणारे अन्याय थांबले नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाने आम्हाला जगण्याचा अधिकार दिलेला असताना आम्हाला या ठिकाणी न्याय का मिळत नाही? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत होता.
दलित-मुस्लिम-ख्रिश्चन व बौद्ध समाजावर होणारे अन्याय कमी झाले पाहिजेत, धर्मांतराच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, राज्यघटनेचा अवमान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, तिरंग्याचा अवमान करून भारतीय स्वातंत्र्य दिवस हा काळा दिवस समजावा, अशी गरळ ओकणाऱ्या संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, गोवंशच्या हत्येखाली व ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली मुस्लिम समाजावर होणारे अन्याय थांबविले पाहिजेत यासह इतर अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.