हनुमंत चिकणे
Print & Digital Media : लोणी काळभोर (पुणे) : पत्रकारिता क्षेत्रात शहरी पत्रकारांचा बोलबाला असला तरी, पत्रकारिता जिवंत ठेवण्याचे काम सध्या फक्त ग्रामीण पत्रकार करत आहेत. ग्रामीण भागातील पत्रकारांनी माध्यमांच्या बदलत्या स्वरूपानुसार पत्रकारिता बदलणे गरजेचे आहे. बदलल्याशिवाय ग्रामीण भागातील पत्रकार सध्याच्या स्पर्धेच्या युगात तग धरू शकणार नाहीत, असे मत ‘न्यूज 18 लोकमत’ वृत्तवाहिनीचे वरिष्ठ पत्रकार विलास बडे यांनी व्यक्त केले. Print & Digital Media
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी विद्यापीठातील राज कपूर सभागृहात प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकारांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा व स्नेह मेळाव्याचे शनिवारी (ता. 22) आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन लोकमतचे संपादक संजय आवटे यांच्या हस्ते करण्यात आले. तर स्नेहमेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्नेहमेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना विलास बडे यांनी मत व्यक्त केले. Media
यावेळी आमदार अशोक पवार, राहुल कुल, विधीज्ञ असीम सरोदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रदीप कंद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, उपसभापती रवींद्र कंद, संचालक प्रशांत काळभोर, सुदर्शन चौधरी, शशिकांत गायकवाड, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती युगंधर काळभोर, कदमवाकवस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड, यांच्यासह प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील जगताप, कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे, उपाध्यक्ष राजेंद्र बाप्पू काळभोर, सचिव संदीप बोडके, खजिनदार विजय काळभोर, सल्लागार तुळशीराम घुसाळकर, प्रभाकर क्षीरसागर, जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे, हवेली तालुका कार्याध्यक्ष सचिन सुंबे यांच्यासह पुणे व सातारा जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. Media
यावेळी बोलताना विलास बडे म्हणाले, खऱ्या अर्थाने पत्रकारिता जिवंत ठेवण्याचे काम सध्या फक्त ग्रामीण पत्रकार करत आहेत. ग्रामीण भागातील पत्रकारांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करुन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे.
जागतिकीकरणानंतरच्या नव्या जगात माध्यमांची क्रांती : संजय आवटे
‘जागतिक स्तरावरील बातमी माध्यमांमुळे तातडीने समजते. ग्रामीण भागातील स्थानिक जनतेच्या वेदना, विवंचना, समस्या समोर येणे ही गरज आहे. स्वत:चे माध्यम उभे करून स्थानिक विषयांमध्ये प्रभावी भूमिका घेण्याची गरज आहे. पूर्वी वर्तमानपत्रात बातमी आल्यानंतरच घटना जगाच्या कानाकोपऱ्यात पसरायची. आता घटना घडताना लगेच समजते. जागतिकीकरणानंतरच्या नव्या जगात माध्यमांची क्रांती झाली. सर्व माध्यमे मोबाईलमुळे हातात आली. कोरोनाच्या काळात डिजिटल माध्यमांना अधिक महत्त्व प्राप्त झाले. ही सगळी माध्यमे एकमेकांचा हात हातात घेऊन चालली आहेत. वृत्तवाहिन्या कोणत्या वर्तमानपत्रात काय आहे हे सांगताना दिसतात. जग, देश स्तरावरील माहिती प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे समजते. पण ग्रामीण भागातील स्थानिक जनतेच्या वेदना, विवंचना, समस्या, समोर येणे ही गरज आहे. त्यातून हायपर लोकल ही संकल्पना उदयाला येत आहे. प्रशिक्षणानंतर स्वत:चे माध्यम उभे करून स्थानिक विषयांमध्ये प्रभावी भूमिका घेण्याची संधी आहे,’ असे संजय आवटे म्हणाले. Print & Digital Media
पत्रकार हेच लोकशाहीचे खरे रक्षक : असीम सरोदे
पत्रकारिता आणि न्यायिक बंधने या विषयावर आपले मत व्यक्त करताना ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी सांगितले की, ‘लोकशाहीचे खरे रक्षक पत्रकार हेच असून भावनिक होऊन पत्रकारिता करण्यापेक्षा कायद्याच्या आधार घेऊन पत्रकारिता करावी. अन्यायग्रस्त पत्रकारिता न करता हिंमत वापरून अन्याय झालेल्या लोकांना मदत करणारी पत्रकारिता असावी.’
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी राज्यातील सर्वसामान्य रुग्णांना मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून झालेल्या मदतीचा आढावा घेत पत्रकारांच्या आरोग्याचे प्रश्न मांडले. सहायता कक्षाच्या माध्यमातून योग्य ती मदत देण्याचे आश्वासन सर्व पत्रकारांना दिले. Print & Digital Media
आरोग्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना प्रिंट व डिजीटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने “आरोग्यदूत पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार मंगेश चिवटे यांना प्रिंट व डिजीटल मिडीया पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष व ‘पुणे प्राईम न्यूज’चे मुख्य संपादक जनार्दन दांडगे यांच्या हस्ते देण्यात आला. तर जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर केल्याबद्दल पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांना संघटनेच्या वतीने “असामान्य कर्तृत्व” पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवाजी ननवरे यांना हा पुरस्कार “न्यूज 18 लोकमत” वृत्तवाहिनीचे वरिष्ठ पत्रकार विलास बडे यांच्या हस्ते देण्यात आला.