भारताच्या राजकारणात आजवर अनेक रथी महारथी होऊन गेले. या सर्वानी देशाच्या राजकारणावर, सामान्य जनतेच्या मनावर भला प्रभाव टाकला. त्यांच्या कार्य पद्धतीमुळे आणि त्यांच्या राजकीय वैचारीक बैठकीमुळे त्यांचे नाव झाले. या अश्या राजकारण्यांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव अग्रगण्य स्थानी नसले तरी पहिल्या पाच मध्ये निश्चित असेल. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, शरद पवार, विलासराव देशमुख, नारायणराव राणे यांसारख्या नेत्यांची नावे घेताना यात एक प्रमुख नाव मागील काही वर्षात जोडलं गेलं आहे. ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस.
दिले ते कार्य कार्यकर्ता म्हणून करेन.
वयाच्या २२ व्या वर्षी राजकारणात प्रवेश केलेल्या देवेंद्र फडणवीसांनी कायमच विकासनीती त्यांच्या कार्याच्या केंद्रस्थानी ठेऊन कार्य केले. २ वेळेला नगरसेवक, देशातील सर्वात तरुण महापौर ते वयाच्या २९ व्या वर्षी आमदार आणि त्या नंतर एकही निवडणूक न हरणाऱ्या फडणवीसांचा राजकीय आलेख हा राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आणि इतरांसाठी देखील थक्क करणारा आहे.
एक एक पायरी चढत, देवेंद्र फडणवीसांनी त्यांची राजकीय कुवत महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिली. नागपूर पासून सुरु झालेला त्यांचा प्रवास लवकरच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पर्यंत त्यांनी मारलेली मजल त्यांच्या कार्यकर्ताभावाची एक पावती होती. दिले ते कार्य कार्यकर्ता म्हणून करेन हा त्यांचा स्वभाव आपण आजही पाहतोच.
सन २०१३ साली त्यांना भारतीय जनता महाराष्ट्र प्रदेश च्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा मिळाली आणि त्यांनी पक्ष बांधणीचे कार्य अत्यंत कार्यकुशलतेने पार पाडले आणि या मुळेच पक्षातील वरिष्ठांनी अनेक अनुभवी नेत्यांना थांबवून देवेंद्र फडणवीसांना २०१४ साली महायुती सरकार मध्ये मुख्यमंत्री पद सांभाळण्याची जबाबदारी दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद हे गरिमेचे पद असले तरी हे पद सांभाळणे अनेकांना जमले नाही.
खुद्द शरद पवारांना त्यांच्या संपूर्ण राजकीय आयुष्यात सलग ५ वर्ष राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवता आलेले नाही. कोणत्या न कोणत्या कारणाने त्यांची ५ वर्ष राहिलीच. पण, त्याच तुलनेत देवेंद्र फडणवीसांनी २०१४-१९ हा संपूर्ण ५ वर्षांचा काळ पूर्ण केला आणि महाराष्ट्राला अनेक गोष्टींमध्ये नंबर १ चे स्थान प्राप्त करून दिले.
देवेंद्र फडणवीसांच्या काळात सर्वात जास्त फॉरीन इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात झाली. देशाच्या एफ.डी.आय. च्या वाट्यात महाराष्ट्र २९% वाटा उचलत होता व या मुळे हजारो रोजगार उपलब्ध झाले. शेतकऱ्यांसाठी प्रलंबित असणारे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. युरिया सारख्या अत्यावश्यक रसायनाला त्यांनी त्यांच्या काळात सवलत मिळवून दिली जेव्हा इतर राज्यांमध्ये युरियाच्या किमती वाढत होत्या. याहून महत्वाचा त्यांचा प्रकल्प म्हणजे जलयुक्त शिवार. पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने अनेक शेतकऱ्यांना त्रास होत होता, जनावरे मृत्युमुखी पडत होती, पण यावरच उपाय म्हणून त्यांनी जलयुक्त शिवार योजना आणली. मागेल त्याला शेततळे या अंतर्गत महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात जलयुक्त शिवार योजना पोहोचली आणि शेतकरी जनता त्रासातून मुक्त झाली.
कोणत्याही यशस्वी राज्याची देशाचे गमक म्हणजे त्यातले रस्ते. हाच विचार मनात ठेऊन देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या काळात पायाभूत सुविधांवर भरपूर भर दिला आणि समृद्धी महामार्ग, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो यांसारख्या गोष्टींना त्वरित अंमलबजावणी करून महाराष्ट्राच्या जनतेला अत्याधुनिकतेकडे ते घेऊन गेले.
गडचिरोली आणि इतर नक्षल ग्रस्त भागांमध्ये अनेक पोलीस मृत्युमुखी पडत होते. डाव्या विचारसरणीच्या लोकांनी काबीज केलेल्या नक्षली मनांना देवेंद्र फडणवीसांनी सोडवले आणि तिथे ते सुविधा घेऊन गेले. आज महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांच्या विशेष प्रयत्नांमुळे नक्षल मुक्त होण्याच्या मार्गावर आहे.
महाराष्ट्राला लाभलेली संस्कृती पुढे घेऊन जाण्यासाठी जपण्यासाठी त्यांनी सचोटीचे प्रयत्न केले. महाराष्ट्रातल्या गडकिल्यांची निगा राखण्यासाठी त्यांनी बजेट मध्ये विशेष योजना आखली. महाराष्ट्र देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा योगदान देऊ शकतो आहे त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस. २०१४-१९ या काळात महाराष्ट्राने सर्वात कमी भ्रष्टाचार अनुभवला. शासन आपल्या दारी अश्या विविध योजना आपल्या राज्यसरकारने जनतेसाठी आणल्या. पंतप्रधान मोदींची दूरदृष्टी आणि त्या द्रष्टेपणातून निर्माण झालेल्या अनेक योजना जनतेपर्यंत यशस्वी रित्या पोहचवण्याचे काम देवेंद्र फडणवीसांनी केले.
सन २०१९ मध्ये पुन्हा एकदा फडणवीसांच्या नेतृत्वात युती सरकारचा विजय झाला पण दुर्दैवाने राजकीय खेळांमुळे त्यांना विरोधी पक्षाचा बाकावर बसावं लागलं. पण भली मेहनत करून आणि राजकीय डावपेच टाकत, देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याच्या सरकार मध्ये परत आले. त्यांनी हिंदुह्रिदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करत एका सामान्य आणि कार्यकर्त्यांच्या नेत्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी बसवले.
आता त्यांच्या सोबत, प्रशासनावर प्रचंड पकड असलेले अजित पवार देखील सरकार मध्ये खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगती पथावर आहे आणि याचे श्रेय निसंकोचपणे देवेंद्र फडणवीस यांना द्यायला हवे. नव्या महाराष्ट्राच्या शिल्पकाराला एका सामान्य कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
– मल्हार पांडे
– लेखक – भाजपा, काल आज आणि उद्या