Mumbai News : मुंबई : आजपासून पावसाळी अधिवेशनाला धडाक्यात सुरूवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी काँग्रेस पक्षाकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सत्ताधाऱ्यांकडून नीट उत्तर न मिळाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर संसद आणि विधिमंडळातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून आज दिवसभराचं कामकाज तहकूब करण्यात आलं.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक होत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाला सभागृहात वाचा फोडत सभात्याग केला. यामुळे सभागृहात काहीवेळ गोंधळ झाला होता. याचदरम्यान, सासूमुळे वाटणी झाली आणि सासूच वाट्याला आली… ५० खोके, एकदम ओके… अशी जोरदार घोषणाबाजी विरोधकांनी केली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. (Mumbai News ) घटनाबाह्य कलंकित सरकारचा धिक्कार, असो अशा आशयाचे बॅनर यावेळी झळकविण्यात आले होते.
दरम्यान, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आल्यास सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी राहील. बोगस बियाण्यांसंदर्भात कडक कारवाई करू. सरकारकडून शेतकऱ्यांना १० हजार कोटींची मदत देण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नव्या मंत्र्यांचा परिचय
पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत नव्या मंत्र्यांचा परिचय करून दिला. दरम्यान, बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच गाडीतून वर्षा ते विधान भवनच्या दिशेने निघाले होते. यामुळे चर्चांना उधाण आले. मंत्रीपदाच्या नाराजीनंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले होते. (Mumbai News ) याबाबत खुलासा करताना कडू म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांसोबत गाडीत बसून आलो असतो तरी आमची मंत्री पदाबाबत चर्चा झालेली नाही, असे सांगून आपण नाराज नसल्याचंही ते म्हणाले.
शरद पवार यांचा गट गायब
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर उभे राहून निदर्शने केली. काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार यावेळी उपस्थित होते. (Mumbai News ) मात्र, आमच्याकडे १९ आमदारांचे बळ आहे म्हणणाऱ्या शरद पवार यांच्या गटाचा एकही आमदार पायऱ्यांवर उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.