Pune News पुणे – बहिणीला अमानुषपणे मारहाण करून छळ केल्याच्या कारणावरून मेव्हण्याने मित्राच्या मदतीने दाजी संदीप शिंपी (रा. बाणेर) यांचे डोके दगडाने ठेचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार डिसेंबर २०२२ मध्ये घडला होता. (Pune News) या खून प्रकरणातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने जमीन मंजुर केला आहे. (Pune News) अशी माहिती ॲड. सुधीर पाटील यांनी दिली आहे. (Pune News)
सतीश गिऱ्हे व त्याचा मित्र दिपक कोळेकर असे जमीन मंजूर झालेल्यांची नावे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस नाईक गणेश चौधर हे दिनांक २९ डिसेंबर २०२२ रोजी मार्शल ड्युटीवर असताना, पाषाण-बाणेर हायवे व्हिंटेज बिल्डींगजवळ, सुस खिंड, बाणेर पुणे येथे रस्त्याच्या कडेला अज्ञात व्यक्ती पडलेला असून त्याचे डोके फुटलेले दिसत आहे. अशी माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता एक अनोळखी व्यक्ती वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे रक्तबंबाळ व बेशुद्ध अवस्थेत संशयितरित्या आढळून आला. सदर व्यक्तिस दगडाचे सहाय्याने डोक्यावर गंभीर मारहाण झालेली दिसून आली. सदर व्यक्तीचा चेहरा देखील चेंबलेला दिसल्याने अज्ञात आरोपीने मयात इसमाची ओळख होऊ नये म्हणून दगडाने ठेचून त्याचा चेहरा विद्रुप केल्याचा निष्कर्ष तपास यंत्रणांनी काढला.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, मृतक संदीप शिंपी याचा खून त्याचा मेहुणा सतीश गिऱ्हे व दिपक कोळेकर यांनी संगनमताने केल्याचे समजले अधिक तपास केला असता तसे निष्पन्न झाले. पोलिसांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेवून आरोपी सतीश गिऱ्हे व दिपक कोळेकर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांस अटक केली. आणि आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.
सरकारी वकीलानी आरोपीच्या जामीन अर्जास तीव्र विरोध करत कोर्टापुढे युक्तिवाद केला कि, आरोपीनी संगनमत करून मयताचे डोके दगडाने ठेचून त्याची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा विद्रुप करून अतिशय क्रूर व निर्दयीपणे खून केल्याचे न्यायालयात सांगितले. दोषारोपपत्रात आरोपीविरुद्ध सबळ पुरावा आहे त्याचप्रमाणे सदर घटना गंभीर असून त्यांना जामीन दिल्यास आरोपी सरकारी पुराव्यात छेडछाड करतील म्हणून आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
बचाव पक्षातर्फे ॲड. सुधीर पाटील यांनी न्यायालयापुढे असा युक्तिवाद केला कि, सरकारी पक्षाची संपूर्ण केस हि परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित असून सदर गुन्ह्यातील दोषारोपपत्राचे अवलोकन केले असता परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी तयार होत नाही. त्याचप्रमाणे सदर आरोपीनीच गुन्हा केल्याचे पाहिलेला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सरकारी पक्षाने न्यायालयासमोर आणलेला नाही.
संपूर्ण दोषारोपपत्रात आरोपींचा सी.डी.आर. व एस.डी.आर. याचे अवलोकन केले असता तो घटनास्थळी दिसून येत नाही. सदर आरोपीनीच खून केल्याचे स्पष्ट आरोप साक्षीदारांच्या जबाबात कोठेही नमूद नाहीत. आरोपी व मयत यांच्यामध्ये कुठलेही वैमनस्य नव्हते व त्याला मारण्याचा कुठलाही हेतू आरोपींकडे नव्हता हे विविध उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर करून ॲड. सुधीर पाटील यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्रीकांत बी. साळुंखे यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून ॲड. सुधीर पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी दिपक विठ्ठल कोळेकर यांना जामीन मंजूर केला. सदर प्रकरणात ॲड. अर्जुन वाघमारे, ॲड. विशाल आबासाहेब वीर-पाटील व ॲड. कार्तिक दारकुंडे-पाटील यांनी सहकार्य केले.