वाई : ग्राहक चळवळ संघटित करीत असताना शोषणमुक्ती साठी ज्याप्रमाणे रचनात्मक कार्याची जरुरी आहे. त्याचप्रमाणे अभाव व अन्यायाशी मुकाबला करण्यासाठी ग्राहक चळवळीने ग्राहक प्रतिकाराचे, संघर्षाचे कार्यक्रम ही हाताळले पाहिजे. असे मत सिक्कीम चे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांनी मांडले
थोर स्वातंत्र्यसेनानी ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी 1974 साली सुरु केलेल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे राज्यस्तरीय अधिवेशन दि. 20 व दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी वाई , जिल्हा सातारा येथे पार पडत आहे. या अधिवेशनाचे उदघाट्न राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना वरील मत पाटील यांनी मांडले. यावेळी कृषी विभागाचे राज्य सह- संचालक विनयकुमार आवटे, पुणे विभागाचे पुरवठा उपायुक्त त्रिगूण कुलकर्णी, ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांतजी पाठक, माजी आमदार दिलीप येळगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरवातीला ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तर विद्यार्थिनींनी ग्राहकगीत सादर केले. तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ग्राहक भैरव या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शहा म्हणाले कि, ग्राहक संघटन, ग्राहक प्रबोधन, रचनात्मक कार्य आणि संघर्षात्मक कार्यक्रम अशीही ग्राहक चळवळीच्या कार्याची चतु:सूत्री आहे. उत्पादनात वाढ जशी व्हायला हवी तशी वितरणात समानता असायला हवी हे सर्व संतुलन राखण्यासाठी ग्राहकाराजाला उपभोगावर संयम ही राखता आला पाहिजे. यासाठी ग्राहक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय दक्ष राहून चहूअंगाने भारतीय ग्राहक चळवळीचे या देशातील ग्राहकांचे संघटन वेधक आणि प्रेरक केले पाहिजे.
दरम्यान, देशस्तरावर कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत या संघटनेच्या पुढाकारातून 1986 साली ग्राहक संरक्षण कायद्या चा जन्म झाला असून या कायद्यान्वये ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हा,राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर त्री स्तरीय अशी न्याय यंत्रणा उभारली गेली आहे. ग्राहक संरक्षण कायद्याच्या निर्मिती मध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अथक परिश्रम आहेत.
या न्याय यंत्रणेबरोबरच ग्राहकांच्या हक्क संरक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या या संघटने च्या माध्यमातून चर्चा, संवाद आणि समन्वय साधत सातत्याने ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात पुढाकार घेतला जातो. विशेष म्हणजे हे प्रबोधन कार्य करीत असताना कोणतेही शासकीय अनुदान स्वीकारले जात नाही. देशाच्या कानाकोपऱ्यात खेडोपाडी समाजशरण वृतीतून कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे ग्राहक प्रबोधनाचे राष्ट्र कार्य गेली 48 वर्ष अविरत पणे सुरु आहे.
यावेळी भारतीय मानक ब्युरो, पुणे विभागाच्या उप संचालक निशा कनबर्गी , सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष मिलिंद पवार, राष्ट्रीय कार्य.सदस्य धनंजयजी गायकवाड ,विलासजी लेले, विज वितरण गाऱ्हाणे मंच पुणे चे सदस्य अजयजी भोसरेकर अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे प्रांताध्यक्ष बाळासाहेबजी औटी, प्रांत उपाध्यक्ष भालचंद्र पाठक, प्रांत संघटनमंत्री प्रसादजी बुरांडे, प्रांत सचिव संदीपजी जंगम,प्रांत सदस्य केदार नाईक,सौ.उर्मिला येळगांवकर, सातारा जिल्हा अध्यक्षा सौ.शुभदाताई नागपूरकर,संघटक प्रवीण शहाणे,कोषाध्यक्ष किशोर फुले,वाई तालुका अध्यक्ष सतीश जेबले, श्रीमंत होनराव, बाबासाहेब कोलार यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत प्रस्ताविक प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी केले आभार केदार नाईक यांनी मानले तर तनुजा इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. या अधिवेशनाचा समारोप सोहळा अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय संघटन मंत्री दिनकरजी सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.