Mumbai News : मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून महायुतीत महत्त्वाचं स्थान मिळवल्यामुळे शिंदे गटातील आमदार, अनेक नेते अस्वस्थ झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून तातडीने आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली. सर्वांचे मत जाणून घेतले आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाची कामगिरी उत्तम व्हावी, यासाठी सर्वांनी एकजूटीने प्रयत्न करायचे आहेत, असे संकेत देत, मुख्यमंत्री शिंदे आतापासूनच अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मी आजही मुख्यमंत्री आहे, उद्याही असणार आहे, तुम्ही चिंता करू नका, असे आवाहन करत मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करू, असं आश्वासनही त्यांनी दिलं. शिंदे यांनी आमदार आणि खासदारांच्या बैठकीत तीन मोठे निर्णय घेतले.
मी आजही मुख्यमंत्री आहे, उद्याही असणार आहे
दरम्यान, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाची खूर्ची मिळणार, तसेच विद्यमान मुख्यमंत्री राजीनामा देणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या बैठकीदरम्यान त्यांनी राजीनामा देणार असल्याचं वृत्त फेटाळून लावलं. (Mumbai News) अजित पवार आल्याने आपल्या गटावर काही परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री म्हणून मीच राहणार आहे. २०२४ नंतरही मीच मुख्यमंत्रीपदी असेन, असं एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांना सांगितलं. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अजित पवार सरकारमध्ये आले असले तरी सरकारवर माझं पूर्णपणे नियंत्रण आहे. तुम्ही काहीही चिंता करू नका. अजित दादा युतीत येणं ही राजकीय सोय आहे.
आमदार आणि खासदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन महत्त्वाचे निर्णय घेतले. विकासकामांवर लक्ष केंद्रीत करावी. (Mumbai News) प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पाच आमदारांची नियुक्ती करावी. महिन्यातून दोन वेळा आमदारांना भेटणार, असे तीन निर्णयही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी शिवसेनेचा महामेळावा आयोजित करण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. (Mumbai News) तसेच काहीही अडचण आली तर आमदारांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. येत्या विधानसभा निवडणुकीत किमान ५० आमदार निवडून आणण्याचं टार्गेट ठेवा, असं आवाहन शिंदे यांनी केलं. राज्यात लोकसभेच्या ४५ जागा निवडून आणण्याचं शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचं टार्गेट असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : आमच्यावर टीका करा; पण बापाचा नाद करायचा नाय… सुप्रिया सुळेंचा सज्जड दम!