Accident News : लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर – कोलवडी रस्त्यावरील उड्डाणपुलावरील दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एका २३ वर्षीय मुलाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी (ता. ०६) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली आहे. (Accident News)
बाबासाहेब बिभीषण गिरी (वय -२३ रा. कळंब, ता. उस्मानाबाद, जि. उस्मानाबाद, मूळ रा. खराडी, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब गिरी हे पुणे – सोलापूर महामार्गावरून त्यांच्या बुलेट या दुचाकीने थेऊरकडे पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास निघाले होते. यावेळी अंधारात उड्डाणपुलावरील दुभाजक दिसून न आल्याने त्यांची बुलेट दुचाकी हि दुभाजकाला धडकली. यामध्ये बाबासाहेब गिरी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. (Accident News)
सदर अपघाताची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उरुळी कांचन येथील कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी बाबासाहेब गिरी यांना लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, बाबासाहेब गिरी यांचे उपचारापूर्वीच निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सदर घटनेचा तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
दरम्यान, अंधारात उड्डाणपुलावरील दुभाजक दिसून न आल्याने अपघात झाल्याचा संशय उपस्थित असलेल्या नागरिकांनी व्यक्त केला आहे. तसेच उड्डाणपुलावर वारंवार अपघात होत असून यामध्ये अनेकांना जीवास मुकावे लागले आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे सदर उड्डाणपुलावरील दुभाजक काढून टाकण्याची मागणी नागरिक अनेक दिवसांपासून करीत आहेत. त्यामुळे आत्तातरी झालेल्या अपघातानंतर दुभाजक काढणार का, असा नागरिक सवाल करीत आहेत. (Accident News)