ACP Padmakar Ghanvat : पुणे : पिंपरी-चिंचवडमधील देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पद्माकर भास्करराव घनवट आणि वाई (जि. सातारा) येथील हवालदार विजय विश्वनाथ शिर्के यांचा लाचखोरी आणि खंडणीच्या गुन्ह्यातील अटकपूर्व जामीन सातारा अतिरिक्त सत्र न्यायालयाने शनिवारी (ता.०१) फेटाळला. त्यामुळे या दोघांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या अटकेची व नंतर निलंबनाची शक्यताही बळावली आहे. (ACP Padmakar Ghanvat)
सातारा शहर पोलीस ठाण्यातील खंडणी व लाचखोरीच्या सातारा शहर पोलीस ठाण्यातील खंडणी व लाचखोरीच्या गुन्ह्यात वरील दोघांना सशर्त हंगामी अटकपूर्व जामीन मिळाल्याने गेले तीन महिने ते बाहेर होते. त्यात त्यांना अटक न झाल्याने त्यांच्या नोकऱ्या वाचल्या होत्या. घनवट हे देहूरोड अगोदर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतही होते.
सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते. तेव्हाच्या एका प्रकरणात हा गुन्हा यावर्षी २८ फेब्रुवारीला दाखल झालेला आहे. मात्र, त्यात तात्पुरता अटकपूर्व जामीन त्यांनी ३१ मार्चला घेतला होता. त्यामुळे त्यांना गेले तीन महिने अटकेपासून संरक्षण मिळाले होते. शनिवारी (ता.०१) सातारा अतिरित्र सत्र न्यायाधीश ए.एस.जाधव यांनी घनवट व शिर्के या दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करणारा अंतिम निकाल दिला.
घनवट साताऱ्यात एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना २०१६ ला त्यांच्यासह त्यांचे त्यावेळचे रायटर (लेखनिक) शिर्के यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झालेला आहे. सातारा येथील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र मधुकर चोरगे हे त्यात फिर्यादी आहेत. पत्नीसह आपला व आपल्या गुरुकुल शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांचा छळ करून २५ लाखांची खंडणी मागून त्यातील १२ लाख तीस हजार रुपये आरोपींनी घेतल्याचे फिर्यादींचे म्हणणे आहे.
दरम्यान, दुसऱ्या एका गुन्ह्यातील फिर्यादीला तीन कोटी रुपये देण्यासाठीही घनवट व शिर्केंनी धमकावल्याची चोरगेंनि तक्रार दिली होती. पण, तिची स्थानिक पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार घनवट व शिर्केविरुद्ध हा जबरी चोरी, खंडणी आणि लाचखोरीचा गुन्हा दाखल झाला होता.