गणेश सुळ
Daund News केडगाव : केंद्र शासनाने 2023-24 च्या अर्थसंकल्पात महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी दोन वर्ष या अल्पमुदतीची ‘महिला सन्मान बचतपत्र’ ही योजना जाहीर केली. ही योजना अल्पबचतीसाठी गुंतवणूक करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत लाभदायक ठरली आहे. (Daund News)
भारतीय डाक विभागाच्या पुणे शहर पूर्व विभागाने 23 ते 26 जून असे तीन दिवसांचे ‘महिला सन्मान बचतपत्र’ योजनेंतर्गत 10 हजार खाती उघडण्यासाठी विशेष अभियान राबवले. पुणे शहर पूर्व विभागातील 65 कार्यालयांमधील सर्व कर्मचारी हे अभियान यशस्वी करण्यासाठी उत्साहाने अभियानाच्या पहिल्या दिवसाच्या पहाटेपासूनच सहभागी झाले होते.
महिलांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नातून या तीन दिवसात 10 हजार 429 महिला गुंतवणूकदारांनी ‘महिला सन्मान बचतपत्र’ खाती उघडली.
काय आहे ‘महिला सन्मान बचतपत्र’ योजना?
1) सदर योजना महिला व मुलींसाठी उपलब्ध आहे. यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.
2) सदर योजना दोन वर्षांसाठी असून व्याजदर 7.5% दराने चक्रवाढ पद्धतीने मिळेल.
3) या खात्यात किमान 1000 रुपये व कमाल 2,00,000 रुपये गुंतवता येतील.
4) सदर योजनेत एका खात्यात एकच Deposit करता येत असल्याने, दुसरे खाते तीन महिन्यांच्या अंतराने उघडता येईल. एका खातेदारास सर्व खाते मिळून 2,00,000 रुपये गुंतवता येतील.
5) एक वर्ष झाल्यानंतर खात्यातून 40% रक्कम एकदाच काढता येते.
6) अपवादात्मक परिस्थितीत खाते मुदतपूर्व बंद करण्याची सोय.
‘महिला सन्मान बचतपत्र’ योजना ही केंद्र शासन मान्यताप्राप्त, सुरक्षित आणि उच्च व्याजदर असलेली विशेषतः महिलांसाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे. त्यामुळे या योजनेस पुणे शहरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या प्रचारासाठी कर्मचारी वर्गाबरोबरच विविध स्वयंसेवी व शैक्षणिक संस्था, महिला बचत गट, विभागीय आयुक्त कार्यालय यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
– डॉ.अभिजीत इचके, प्रवर अधिक्षक, डाक घर, पुणे शहर पूर्व विभाग.