Big Breaking सोलापूर : सोलापूर शहरातील होटगी रस्त्यावरील शाही आलंमगिर ईदगाह मैदानावर आज बकरी ईदच्या दिवशी एक धक्कादायक प्रकार घडला. (Big Breaking) ईदगाह मैदानासमोर एक फुगेवाला पाकिस्तान जिंदाबाद, लव्ह पाकिस्तान… असा मजकूर लिहिलेल्या फुग्यांची खुलेआम विक्री करत होता. नमाज पठणासाठी आलेल्या मुस्लीम बांधवांनी जागृकता दाखवत या विकृत फुगे विक्रेत्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. (Big Breaking)
अनेक मुस्लीम बांधव मुलांना घेऊन नमाज पठणासाठी ईदगाह मैदानात येतात. लहान मुलं फुग्यासाठी हट्ट धरतात. मुलांच्या हट्टासाठी फुगे विकत घेतले जातात. दरम्यान, फुगे विकत असताना नमाज पठणसाठी आलेल्या मुस्लीम बांधवांचे लक्ष फुगेवाल्याकडे गेले. या फुग्यांवर आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला होता, हे लक्षात येताच जागरूक मुस्लीम बांधवांनी ताबडतोब या परिसरात तैनात असलेल्या पोलिसांना माहिती दिली व फुगेवाल्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. अजय पवार (रा. पारधी वस्ती, विजापूर रोड, सोलापूर) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
दरम्यान, मुस्लीम बांधवांचं लक्ष गेल्यावर फुगेवाल्याला पाकिस्तान समर्थक मजकूर लिहिलेल्या फुग्यांची विक्री का करत आहेस, असा जाब विचारण्यात आला. हे फुगे किती जणांना विकले, असे विचारले असता फुगेवाल्याची भंबेरी उडाली. हा फुगा एखाद्या मुलाने हातात घेतला असता, तर आक्षेपार्ह मजकूर पाहून त्याचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असते. त्यानंतर मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असती. त्यातच आज बकरी ईद आणि आषाढी एकादशी असे दोन्हीही सण एकत्रित असल्यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आहे. यातून वादंग उसळल्यास बाका प्रसंग निर्माण झाला असता.
दरम्यान, संबंधित फुगेवाला अशिक्षित होता. हे फुगे कुठे तयार झाले, कुठल्या होलसेल विक्रेत्याकडून त्याने खरेदी केले, याची चौकशी पोलीस करीत आहेत. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी एमआयएमच्या वतीने करण्यात आली आहे. हा सामाजित तेढ निर्माण करण्याच प्रयत्न असून, यातील आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रियाज सय्यद यांनी केली आहे.
एमआयएम नेते रियाज सय्यद यांनी या प्रकाराची तत्काळ गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनकडे निवेदन दिले आहे. मुस्लीम धर्मीयांच्या सणादिवशी ईदगाह मैदानावर पाकिस्तान समर्थनाचे फुगे विक्री केल्याची बाब गंभीर आहे. हे फुगे विक्री करणारे सर्वसामान्य आणि गोरगरीब आहेत. पण यामागे षडयंत्र रचणारे कोण लोक आहेत, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करणारे निवदेन पोलीस निरीक्षक विजापूर नाका यांच्याकडे एमआयएमकडून देण्यात आले आहे.