राहुलकुमार अवचट
यवत : यवत पोलीस ठाण्याला नवीन जागा, दौंड पोलीस ठाणे, उपविभागीय कार्यालयाच्या बांधकामासाठी निधी आणि पाटस पोलीस ठाणे लवकरच स्वतंत्र होण्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत मागणी केली आहे. या मागणीला विधानसभा अध्यक्षांनी सकारात्मक धरून शासनाला कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
आमदार राहुल कुल म्हणाले कि, दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याचे १९८० च्या सुमारास पोलीस ठाण्यामध्ये रुपांतर झाले आहे. येथे पोलीस कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, संचालन मैदान व अपघात व कार्यवाहीत पकडलेली वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही. यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ५२ गावांचे, ३७ किलोमीटरच्या महा मार्गालगतचे कार्यक्षेत्र आहे. उक्त गावांच्या हद्दीतून रेल्वे मार्ग, नदी, घाटरस्ते, वाढते औद्योगिकरण यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत आहे.
यवत पोलीस ठाण्याजवळच शासनाच्या नावे असलेली जागा पोलीस स्टेशनाला मिळणेबाबतचा प्रस्ताव दि. १६ फेब्रुवारी २०२२ वा त्यापूर्वीपासून त्रुटींची पूर्तता करून शासन दरबारी दाखल करण्यात आला आहे. २४ डिसेंबर २०२१ रोजी पोलीस ठाण्याच्या बांधकामास सुमारे ३ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध राज्य शासनाकडून उपलब्ध झालेला आहे. परंतु, जागे अभावी अद्याप काम सुरु झालेलं नाही. त्यामुळे सदर जागा मिळण्याबाबत शासनाने कार्यवाही करावी.
राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने सादर केलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचा सुधारित आकृतीबंधामध्ये मौजे पाटस, ता. दौंड या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन निर्माण करणेबाबतच्या प्रस्तावाचा समावेश करण्यात आला आहे. पोलीस दलाचा सुधारित आकृतीबंध वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. उपलब्ध मनुष्यबळाच्या सहाय्याने हे पाटस, ता. दौंड येथील पोलीस स्टेशन सुरु करता येणे शक्य आहे.
दरम्यान, दौंड पोलीस स्टेशन व उपविभागीय कार्यालय यांच्या बांधकामासाठी देखील निधी मिळण्याची आवश्यकता आहे. यवत पोलीस ठाण्याच्या नवीन बांधकामास जागा, दौंड पोलीस स्टेशन व उपविभागीय कार्यालय यांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत व पाटस येथील नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करण्याबाबत शासनाने कार्यवाही करावी. अशी मागणी आमदार कुल यांनी यावेळी केली आहे. या मागणीला विधानसभा अध्यक्षांनी शासनाला कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहेत.