Bhor News भोर : टेम्पोसह तब्बल ७४ लाखाचा गुटखा पोलिसांनी मोरवाडी (ता भोर जि पुणे) गावाच्या हद्दीत असणाऱ्या वनविभागाच्या क्षेत्रात पकडला आहे. (Bhor News) याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bhor News)
राजगड पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल
ऋत्विक दशरथ मोरे (वय २४, व्यवसाय क्लिनर रा. मोरवाडी, पोस्ट किकवी, ता. भोर जि.पुणे), सुधाकर कल्याण पानसरे, दिनेश कल्याण पानसरे (दोघे रा. शिवरे ता भोर जि पुणे) व निजाम (नाव, पत्ता पूर्ण माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोरवाडी हद्दीतील असलेल्या वनविभागात एक आयशर टेम्पोमध्ये गुटखा असून तो आडबाजूला लावून ठेवलेला आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथके तयार केले. त्यानंतर पथकाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून टेम्पो (एम.एच. १२ एम. व्ही. ८२४७) ताब्यात घेतला. या टेम्पोत विमल पान मसाला, रजनीगंधा पान मसाला, सुगंधी तंबाखू असे प्रतिबंधीत पदार्थाचा माल, मोबाईल फोन व आशयर टेम्पो असा एकूण ७३ लाख ८५ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, पोलिसांनी या कारवाईत ऋत्विक मोरे याला ताब्यात घेतले. सदर गुटख्याचा माल हा सुधाकर पानसरे, दिनेश पानसरे व पुणे येथील निजाम याच्या कडे घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सर्वाविरोधात राजगड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार करीत आहेत.
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ, सहाय्यक फौजदार हनुमंत पासलकर, पोलीस हवालदार महेश बनकर, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, अजय घुले, प्रमोद नवले, बाळासाहेब खडके, अमोल शेडगे, नाना मदने, मयुर निंबाळकर, योगेश राजीवडे यांच्या पथकाने केली आहे.