सुरेश घाडगे
परंडा : आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरीला निघालेल्या श्रीक्षेत्र आपेगाव येथील श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखीचे शनिवारी (दि.२४) सायंकाळी सहाच्या सुमारास परंडानगरीत विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. यात काशीमबाग व कुऱ्हाड गल्ली येथे प्रथमतः तर पाटील गल्ली येथे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व विश्वासराव पाटील यांनी स्वागत केले. परंपरेप्रमाणे पाटील यांच्या येथे ही पालखी मुक्कामी विसावली. तत्पूर्वी कुऱ्हाड गल्ली येथील श्री विठ्ठल मंदिर येथेही पालखी काही वेळ विसावली होती.
माजी नगराध्यक्षा सिंधुबाई डाके यांच्या वतीने वारकरी यांना अल्पोपहार व चहा देण्यात आला. ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचे जन्मगाव असलेल्या आपेगाव येथून माता-पिता विठ्ठलपंत व रुक्मिणी माता यांच्या चरण पादुका पालखी सोहळ्यास 881 वर्षाची परंपरा असून, माऊलीचे पणजोबा त्र्यंबकपंत यांनी शके 1129 ला पालखी सुरु केली. ती परंपरा आजही चालू आहे. माऊली आपल्या आई-वडिल व भांवडांना घेऊन पंढरपूरच्या विठोबाच्या वारीला जाणारी महाराष्ट्रातील एकमेव पालखी आहे.
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व विश्वासराव पाटील
यांच्या निवासस्थानी मुक्काम झाला. भोजनानंतर रात्री पूजा, भजन-कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तर सोमवारी सकाळी 7 वाजता दिपक थोरबोले यांच्या शेतात काही वेळ विश्रांती घेऊन अल्पोपहारानंतर ही पालखी आवारपिंपरी मार्गे पंढरपुरकडे मार्गस्थ होणार आहे.