Z. P. School News : वेल्हे (पुणे) : ज्ञानगंगा तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. शिक्षणाच्या प्रसारापासून एकही मूल वंचित राहू नये, यासाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्यात आले आहे. शासनस्तरावर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न होत असतात. मात्र, शिक्षणाची ही गंगा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणारे शिक्षकच या नियमातील पळवाटा शोधून स्वतःची पोळी भाजून घेत असतील तर? असाच प्रकार पुणे जिल्ह्यातील अतिमागास वेल्हे तालुक्यातील टेकपोळे या गावात घडला. (Z. P. School News)
टेकपोळे या गावात एकही विद्यार्थी नाही. मात्र, शाळा आणि शिक्षकाचा पगार अगदी वेळेत होत आहे. विद्यार्थी नसल्याने प्रशासन शाळा बंद करणार होते. यासाठी या शिक्षकाने शक्कल लढवून तीन वर्षांपूर्वी स्वतःच्या मुलीला शाळेत दाखल केले. तेव्हापासून एका मुलीवर टेकपोळे शाळा सुरू आहे. दरमहा हजारो रुपयांचे वेतन शिक्षक आपल्या मुलीला शाळेत उपस्थित असल्याचे दाखवून घेत आहे. (Z. P. School News)
जिल्हा परिषद प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पुणे जिल्ह्यातील अतिमागास वेल्हे तालुक्यात प्राथमिक शिक्षणाचा खेळखंडोबा सुरूच आहे. टेकपोळे गावात सध्या शाळेत दाखल करण्यासाठी विद्यार्थीच नाहीत. यामुळे ही शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. दरम्यान, येथे कार्यरत असलेल्या शिक्षकाने अचाट शक्कल लढवली. स्वतःच्या मुलीला या शाळेत दाखल करून घेतले आणि एक विद्यार्थी शाळा सुरू असल्याची कागदोपत्री नोंद केली. (Z. P. School News)
शिक्षक ज्या शाळेत शिकवतात, त्याच गावात त्यांनी राहणे बंधनकारक आसते. मात्र, टेकपोळे शाळेतील हे एकमेव शिक्षक सध्या गावातही राहत नाहीत. आठवड्यातील काही दिवस ते नदीपलीकडील गोंडेखल गावात राहतात. त्यामुळे शाळेत दाखल असणारी एकमेव विद्यार्थिनी देखील टेकपोळे गावची नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Z. P. School News)
गेल्या तीन वर्षांत या शिक्षकाने सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून लाखो रुपयांचे वेतन लाटले आहे. शिक्षण विभागाच्या केंद्रप्रमुखांपासून ते विस्तार अधिकाऱ्यांपर्यंत सर्व प्रशासकीय यंत्रणांना हा प्रकार माहीत असून देखील या प्रकाराची कोणीही गांभीर्याने दखल घेतलेली नाही. (Z. P. School News)
दरम्यान, २०२३-२४ हे नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून टेकपोळे शाळा उघडलेलीच नाही, अशी तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे. या आधीही खडकवासला येथील कोल्हेवाडीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून शिक्षकांनी अनेक वर्षे शाळा सुरु ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. पानशेत धरण भागातील घिवशी गावात देखील विद्यार्थी नसताना शाळा सुरू आहे. आंबेगाव बुद्रुकच्या शाळेत एका विद्यार्थ्यासाठी दोन शिक्षक तर वडघर, शिरकोली, माणगाव येथील शाळा भरदुपारीच सोडून सर्व शिक्षक पसार झाल्याचे पाहून अधिकारी देखील चक्रावून गेले. (Z. P. School News)
या प्रकाराबाबत बोलताना वेल्हे पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी पोपटराव नलावडे म्हणाले की, “टेकपोळे शाळेत एक विद्यार्थिनी असून, ती शाळेतील शिक्षक मोरे यांची मुलगी आहे. गावात विद्यार्थी नाहीत. शिक्षक दूर गावी राहतात. तेथील शाळेत त्यांनी त्यांच्या मुलीला दाखल करावे, अशी सूचना संबंधित केंद्रप्रमुखांना दिली आहे. (Z. P. School News)
शिक्षण विभागाकडे सक्षम यंत्रणेचा अभाव..
तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक गावांत विद्यार्थी नाहीत; मात्र शाळा सुरू आहे. शिक्षक कधीही येतात आणि कधीही शाळा सोडून जात आहेत. कामचुकार शिक्षकांवर अंकुश ठेवण्यासाठी शिक्षण विभागाकडे सक्षम यंत्रणा नसल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी अशी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने या पदांचा कारभार प्रभारी म्हणून स्थानिक शिक्षक अधिकारी पाहात आहेत. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा घसरत चालला आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. (Z. P. School News)