रांजणगाव : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा पाठलाग शिक्रापूरला झाला नाही, तर तो एक गैरसमज आहे. अशी माहिती रांजणगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी दिली आहे.
पुणे-मुंबई महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीचा रविवारी (ता. १४) अपघात झाला होता. या अपघातात विनायक मेटे यांचे निधन झाले होते. विनायक मेटेंच्या निधनावर पत्नी, नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यानंतर शिक्रापूर जवळ विनायक मेटेंच्या मोटारीचा पाठलाग केल्याची क्लिप व्हायरल झाली आहे.
अधिक माहिती देताना मांडगे म्हणाले की, पोलिसांनी संबंधित गाडी आणि गाडीचा चालकांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. चौकशीदरम्यान गाडीचा मालक, चालकाचे नाव संदीप विर आणि त्यांचे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी भांबर्डे गावामध्ये चालले होते. यामुळे नगर रस्त्यावरून ते अनेक वाहनांना मागे टाकत घाईगडबडीने पुढे जात होते. त्यांना संबंधित मोटार विनायक मेटे यांची होती, याची कल्पनादेखील नव्हती. चौकशी केल्यानंतर चालक व मोटार सोडून देण्यात आली आहे.’
दरम्यान, विनायक मेटे यांच्या गाडीचा ३ ऑगस्टला शिक्रापूरजवळ दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग झाल्याचा दावा एका कार्यकर्त्याने केला होता. आणि त्या कार्यकर्त्याची संवाद साधतानाची ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी आता चौकशी सुरू केली आहे.