Politics News पुणे : स्वत:च्या पक्षाची काळजी करा, येणाऱ्या काळात काहीही घडू शकतं असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिल आहे. (Politics News) शिंदे- फडणवीस सरकार झाल्यापासून महाविकास आघाडी व सरकार यांच्यामध्ये वार-पलटवार सुरु आहे. (Politics News)
शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वकाही आलबेल नाही, येत्या काळात शिंदे गटाचे आमदार कदाचित भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढतील, असा दावा जयंत पाटलांनी केला होता त्यावर श्रीकांत शिंदे यांनी यांनी टिप्पणी केली आहे.
श्रीकांत शिंदे म्हणाले की, ‘कुणीतरी आमच्या चिन्हाबद्दल बोलतंय. तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही आपली काळजी करा. आपल्या पक्षाची काळजी करा. येणाऱ्या काळात अजून काही घडू शकतं, याची काळजी करा. त्यांच्या पक्षात लोक राहणार आहेत की नाही? ते कुठल्या पक्षात जाणार आहेत? याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. आमच्या लोकांचा विचार करण्याची गरज नाही. आम्ही सक्षम आहोत.
आता शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष झालं आहे. पण विरोधकांना त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा चघळायच्या आहेत. त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही. विरोधक ‘शासन आपल्या दारी’ या योजनेवरही टीका करत आहेत. यांचं शासन कधी लोकांच्या दारी गेलं नाही. हे घरात बसूनच काम करत होते. त्यांचं सरकार म्हणजे ‘शासन आपल्या घरी’ असं बोललं तरी चालेल.’
काय म्हणाले होते जयंत पाटील
भारतीय जनता पार्टीने सत्ता टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासमोर गुडघे टेकवले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे सर्व नेते भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचा आग्रह करतील. लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे. येत्या काळात आपल्याला हळूहळू सगळं समजेल, असं जयंत पाटील म्हणाले होते.