राहुलकुमार अवचट
यवत – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व तिसरा श्रावणी सोमवारनिमित्त जिल्हातील प्रसिद्ध असलेले माळशिरस येथील भुलेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी आज सोमवारी (ता.१५) मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
भुलेश्वर मंदिरात विविध प्रकारची फुले वापरून आकर्षक रांगोळी, फुलांची व फळांची आरास घालण्यात आली होती. तसेच मंदिर परिसरात शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुल विक्रेते, प्रसाद व पेढेवाले यांच्या दुकानावर मोठी गर्दी झाली. त्यामुळे मंदिर परिसरात मोठी वर्दळ पहायला मिळत होती.
भुलेश्वर मंदिरात पहाटे अभिषेक व महापुजा संपन्न झाली,दुपारी कावड यात्रेत भक्तांनी पारंपरिक खेळाचा आनंद घेतला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भुलेश्वर मंदिराला तिरंगा स्वरुपातील आकर्षक सजावट करण्यात आली होती. दरम्यान, आज सुट्टी असल्याने राज्यभरातून हजारो शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती