विशाल कदम
Ashadhi Wari 2023, लोणी काळभोर : सावळा विठुराया भक्तांना कधी आणि कोणत्या रुपात दर्शन देईल, हे कोणालाही न उलगडणारं कोडं आहे. आता हेच पहा ना, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज (ता. १५) उरुळी कांचन येथे येत असल्याने, येथील साईनाथ मित्र मंडळाने वारीचे एक चित्र इंटरनेटवरील एका संकेतस्थळावरून मिळवले आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी फ्लेक्स रुपात झळकवले. (Ashadhi Wari 2023)
पालखी सोहळ्यासोबत आलेल्या एका वारकऱ्याने हा फ्लेक्स पाहिला आणि फ्लेक्ससमोर हात जोडून नतमस्तक झाला. त्याच्या या कृतीचे गमक कोणालाच उलगडेना! अखेर त्यानेच खुलासा केला. फ्लेक्सवरील विठुरायाच्या भव्य चित्रासोबत भक्तिरसात दंग होऊन पंढरीला निघालेला वारकरी दुसरा-तिसरा कोणी नसून, तो स्वतःच असल्याचे त्याने फ्लेक्स पाहताच ओळखले… अन् लाडका विठुराया भेटल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहू लागले.
या भाग्यवान वारकऱ्याचे नाव आहे, तानाजी बेंबळेकर. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बेंबळे हे त्यांचे गाव. बेंबळेकर हे एक प्रगतशील शेतकरी असून, पाडुरंगाचे निसिम्म भक्त आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील एका दिंडीत ते चोफदार आहेत. गेली एक-दोन नव्हे तर तब्बल ४१ वर्षे ते पायी वारी करून पांडुरंगाची मनोभावे सेवा करत आहेत.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज उरुळी कांचन येथे आला. या पालखी सोहळ्यात बेंबाळकर सहभागी झाले आहेत. या वेळी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी लावलेला फ्लेक्स बेंबळेकर यांच्या निदर्शनास आला.
नीट न्याहाळून पाहिले असता, या फ्लेक्समध्ये विठुरायासोबत दिसणारे वारकरी दुसरे-तिसरे कोणी नसून, ते स्वतःच असल्याचे त्यांना उमगले आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पंढरीचा सावळा विठुराया कोणाला आणि कोणत्या रूपात दर्शन देईल हे सांगता येत नाही, अशी प्रतिक्रीया बेंबाळकर यांनी व्यक्त केली.
पंढरीचा महिमा। देतां आणिक उपमा।।
ऐसा ठाव नाही कोठे। देव उभा उभी भेटे।।
या उक्तीची प्रचिती यानित्ताने आली. याबाबत बोलताना तानाजी बेंबळेकर म्हणाले की, मागील ४१ वर्षांपासून मी पाडुरंगाची सेवा करीत आहे. कोणतेही संकट आले तरी वारी चुकवत नाही. उरुळी कांचन येथील साईनाथ मित्र मंडळाने प्रसिद्ध केलेल्या फ्लेक्समध्ये माझे छायाचित्र आल्याने मला खूप आनंद झाला आहे. पांडुरंगाने निष्ठावंत भक्तासाठी दिलेली ही भेट आहे,असे म्हणता येईल.
साईनाथ मित्र मंडळाच्या सदस्यांनी या माऊली भक्ताला माऊलीशेजारी उभे करून मोठ्या भक्तिभावाने त्यांची सुंदर छबी टीपली. बेंबळेकर यांचा यथोचित सन्मान केला व वारीची वाट सुखकर होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. काही गोष्टी योगायोगाने घडतात आणि समोरच्याला एक सुखद अनुभूती देऊन जातात, याचीच प्रचिती यानिमित्ताने आल्याची भावना वारकरी भाविकांनी व्यक्त केली.