पुणे : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी “कोम्बिंग ऑपरेशन” राबवून सुमारे ३ हजार ३८१ गुंडांची झाडाझडती करून तब्बल ६१ जणांना अटक केली आहे.
हडपसर भागात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील पसार आरोपी आकाश मोहन कांबळे (रा. फुरसुंगी) याला अटक केली आहे. तर चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पसार आरोपी जय विटकर, अनिल विटकर (रा. लाल चाळ, गोखलेनगर) यांना अटक करण्यात आली आहे. खंडणी विरोधी पथकाने पिस्तूल बाळगल्याप्रकरणी आकाश अरुण पवार (रा. दत्तनगर, कात्रज) याला अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त केले.
गुन्हे शाखेने पिस्तूल बाळगणाऱ्या दोन गुंडांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या सराईतांच्या विरोधात कारवाई करून पोलिसांनी ३५ जणांना अटक केली आहे . त्यांच्याकडून २९ कोयते, तलवारी, पालघन, खंजीर, मोबाइल संच, दुचाकी असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
पोलिसांनी बेकायदा गावठी दारू विक्रीप्रकरणी ११ जणांना अटक केली. त्यांच्याकडून गावठी दारू तसेच साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत शहरातील हॉटेल, लॉजची तपासणी करण्यात आली. वाहतूक शाखेकडून संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. मुंबई प्रतिबंधक कायद्यान्वये १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी शहरातील ३ हजार ३८१ गुंडांची तपासणी केली. त्यापैकी ५४७ गुंड त्यांच्या घरी वास्तव्यास असल्याचे आढळू आले. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतुसे, कोयते, तलवारी असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ ‘गुप्ता, , सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, नामदेव चव्हाण, रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाटगे, प्रियंका नारनवरे, सागर पाटील, पौर्णिमा गायकवाड, रोहिदास पवार, नम्रता पाटील, राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.