Mauli Palkhi News पिंपरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांचे दिघी मॅगझीन चौकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. (Mauli Palkhi News)
शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरात सकाळी नऊ वाजताच्या सुमारास संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन झाले. यावेळी आमदार लांडगे यांनी काही अंतर पालखी रथाचे सारथ्यदेखील केले. यावेळी कापडी पिशवी, खाऊ वाटप, छत्री वाटप, रेनकोट वाटप, पाणी बॉटल वाटप करण्यात आले. अत्यंत भक्तीमय वातावरणात पालखीला निरोप देण्यात आला.
पालखी सोहळ्यात टाळ-मृदंगाचा नाद, हाती घेतलेली एकतारी वीणा आणि चिपळ्या यांच्या सुरांवर ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा होणारा जयघोष.. डोईवर तुळशी वृंदावन आणि मुखी विठ्ठलनामाचा गजर करीत मार्गक्रमण करणाऱ्या महिला.. कधी कडक ऊन तर कधी ढगाळ हवामानामुळे आलेली सावली अशा वातावरणात तसूभरही कमी न झालेला उत्साह.. विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी घेऊन निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी रथाचे स्वागत पिंपरी-चिंचवडकरांनी मनोभावे केले.
श्रीक्षेत्र पंढरपूर येथील अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री. विठूमाऊलीच्या दर्शनाची ओढ असलेले वारकरी आणि विठूमाऊलीच्या देव-भक्ताच्या नात्याचे प्रतिक म्हणजे आषाढी वारी पालखी सोहळा आहे. १३ व्या शतकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन, सर्वांना एकत्र घेऊन, समतेच्या तत्त्वाला धरून वारीत चालू लागले. ही परंपरा आजही अत्यंत भक्तीभावाने सुरू आहे. हा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृती, अध्यात्माचा आणि भागवत धर्माचे वैभव आहे.
– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.