पुणे : जॉनी लिव्हर यांचा आज (रविवार) वाढदिवस. प्रसिद्ध असलेले जॉनी लिव्हर 14 ऑगस्ट रोजी आपला 65 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही रंजक किस्से
जॉनी लिव्हर यांचा जन्म 14 ऑगस्ट 1957 रोजी कानिगिरी, आंध्र प्रदेश येथे झाला. जॉनी यांनी प्रत्येक सुपरस्टारसोबत (Johnny Lever Movie) काम केले आणि जगभरात प्रसिद्ध झाले. जॉनी लिव्हर यांच्याकडे आज कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे, पण लहान असताना ते सामान्य जीवन जगत होते. हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यापूर्वी त्यांनी रस्त्यावर पेन विकण्याचे कामही केले. यादरम्यान ते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मिमिक्रीही करत होते.
जॉनी यांना सुरुवातीपासूनच चित्रपट पाहण्याची आणि चित्रपटांमध्ये काम करण्याची आवड होती. आज संपूर्ण जग जॉनी यांना ओळखत असून आज ते कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेचा धनी आहेत. जॉनी आजही चित्रपटांमध्ये काम करत आहेत. त्यांचं अभिनय आणि कॉमेडी सर्व वयोगटातील लोकांना आवडते.
बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार म्हणून त्यांची आज ओळख आहे. 90 च्या दशकात त्यांनी आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत खूप नाव कमावले. जॉनी यांचे खरे नाव माहित आहे का? जॉनी लिव्हर यांचे खरे नाव जॉन प्रकाश राव जनुमाला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यापूर्वीच त्यांनी आपले नाव बदलले होते. यामागे एका रंजक किस्सा आहे. ‘हिंदुस्तान लिव्हर’ या कंपनीच्या नावावरून जॉनी यांचे नाव जॉनी लिव्हर पडले. खरंतर जॉनीचे वडील या कंपनीत काम करायचे आणि कधी कधी जॉनी वडिलांसोबत त्यांच्या ऑफिसला जायचे. ऑफिसमध्ये काही कार्यक्रमादरम्यान जॉनी अनेकदा चित्रपट कलाकारांची नक्कल करत आणि लोकांना खूप हसवायचा. त्यामुळे लोक त्यांना जॉनी लिव्हर म्हणू लागले. पुढे जाऊन त्यांनी याच नावाने बॉलिवूड मध्ये एन्ट्री केली.