हडपसर : शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देशात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिल, त्या हुतात्म्यांना अभिवादन करूया” चला रक्तदान करू या असे आवाहन ‘जगदंब प्रतिष्ठान’ च्या माध्यमातून केले आहे. त्यानुसार संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला ६ लक्ष रुपयांच्या विमाकवचाचा लाभ देण्यात येणार आहे.
रविवारी (ता. १४) सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर-हवेली, भोसरी आणि हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघातील जवळपास ४० ठिकाणी या रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. त्यानुसार हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. १) २२ केशवनगर मांजरी (अजित घुले संपर्क कार्यालय, केशवनगर मांजरी रस्ता) २) प्रभाग क्र.२३ साडेसतरा नळी १५ नंबर आणि प्रभाग क्र. २४ साधना शाळा – माळवाडी (एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर) ३) प्रभाग क्र. २५- सातववाडी गाडीतळ (क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यानिकेतन, गाडीतळ) ४) प्रभाग क्र. ४७ कोंढवा- (सर्वे नं.५४, मारुती कॉम्प्लेक्स, बधेनगर, खडीमशीन चौक कोंढवा) ५) प्रभाग क्र. ५७ सुखसागर नगर (अंबामाता चौक) ६) प्रभाग क्र. ४१ व ४२ कोंढवा बु. सय्यद नगर, (कौसरबाग मस्जिद) ७) प्रभाग क्र.४४ ससाणे नगर काळेपडळ (सावली फौंडेशन, ससाणे नगर) ८) प्रभाग क्र. ४६ महमंदवाडी- (दादा गुजर विद्यालय, तरवडेवस्ती) ९) कात्रज गोकुळनगर – (विघ्नहर्ता कॉलनी, लेन नं.३, विठ्ठल रुक्मिणी मंदिर) या ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या ठिकाणी होणाऱ्या रक्तदान शिबीरासाठी आमदार चेतन तुपे, सुरेश अण्णा घुले, हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे यांनी कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त रक्त संकलन व्हावे यासाठी जातीने लक्ष घातले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा शिरूर लोकसभा मतदारसंघातील रक्तदान शिबिराच्या केंद्रांना भेट देण्याचा मनोदय असून जास्तीत जास्त केंद्रांवर पोहोचून रक्तदाते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना प्रोत्साहित करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. मात्र जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करून या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले आहे.