Leopard Attack | जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यासह इतर भागाच बिबट्यांचा मुक्त वावर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे रात्रीच नव्हे तर दिवसाही घराबाहेर पडणे जीवावर बेतू शकते असी परिस्थिती निर्माण झाली आहे. एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच दुसरी धक्कादायक घटना समोर आली आहे.
जुन्नर तालुक्यातील कल्याण-नगर महामार्गावर आळेफाटा परिसरातील ज्ञानेश्वर माऊली बॉडी बिल्डर्स यांच्या पत्रा शेडमध्ये असणाऱ्या पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार करुन पसार झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री (14 मे) सव्वा दोन वाजताच्या सुमारास घडली. यात शेडमध्ये झोपलेला तरुण मात्र बचावला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.
अचानक कुत्र्यावर हल्ला…
आळेफाटा परिसरातील कल्याण रोडवर सुदामा मुन्निलाल शर्मा यांचे ज्ञानेश्वर माऊली बॉडी बिल्डर्स या नावाने रिपेअरिंगचे गॅरेज आहे. रविवारी रात्री दिवसभरातील कामे आटोपून त्यांचा मुलगा सुधाकर आणि पाळीव कुत्रा नेहमीप्रमाणे पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. मध्यरात्री सव्वा दोन वाजताच्या सुमारास बिबट्या वाहनांच्या आडोशाने दबक्या पावलांनी आला. बिबट्याने अचानक कुत्र्यावर हल्ला केला. कुत्र्याचा आवाज आल्याने सुधाकर यास जाग आली. मात्र डोळ्यादेखत बिबट्याने कुत्र्याची शिकार करुन बिबट्या पसार झाला. या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
काही दिवसांपूर्वी बिबट्याने सहा फुटी सुरक्षा भिंतीवरुन उडी घेत, पाळीव कुत्र्याची शिकार केली होती. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता. 30 एप्रिलच्या मध्यरात्री ही घटना घडली होती. पुण्याच्या मंचरमधील ही घटना होती. मात्र या बिबट्याने थेट सहा फुटी सुरक्षा भिंतीवरुन उडी घेत अशी शिकार केल्याने बिबटक्षेत्र परिसरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण पसरलं होतं.
पाण्याच्या शोधात हे बिबटे वस्तीत…
मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये बिबट्यांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिक धास्तावले आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याच्या शोधात हे बिबटे वस्तीत शिरत असावेत असा अंदाज आहे. मात्र या बिबट्यांच्या अशा वावरामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
सध्या बिबट्याचा धडकी भरवणारा हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे. यात बिबट्या थेट सहा फूट उंच असलेल्या भिंतीवरुन उडी मारुन घरात शिरताना दिसत आहे आणि कुत्र्यावर हल्ला करुन त्याची शिकार केल्याचं दिसत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Leopard : खेड तालुक्यातील वेताळे येथे विहिरीत आढळला बिबट्याचा बछडा ; पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी..