Fraud | पिंपरी : व्हाॅईट काॅलर जाॅब, उच्च पगाराची नोकरी, परदेशाला साजेसे असे वातावरण याची भुरळ पडत अनेक तरुन आयटी क्षेत्राकडे वळत आहेत. त्याप्रमाणे मोठ्या पगाराच्या नोकऱ्याही मिळत आहेत. आता मात्र त्यात बदल होत असून खरंच आयटी क्षेत्रात गेल्यावर ऐटीत राहु शकेल का ? असा गंभीर प्रश्न आता उभा ठाकला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे तसेच परकीय चलन मिळवून देणारे सर्वांत मोठे क्षेत्र मानल्या जाणाऱ्या आयटी क्षेत्रात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून मोठे बदल पहावयास मिळत आहेत.
एकेकाळी आपल्या कुशल मनुष्यबळालाच आपले मोठे भांडवल मानणाऱ्या आयटी कंपन्या आता कर्मचाऱ्यांना फक्त कामापुरते वापरण्याच्या नवनवीन युक्त्या शोधत आहेत. चांगले कर्मचारी सोडून जाऊ नयेत, म्हणून जाइनिंग लेटरमध्ये विचित्र अटी टाकणाऱ्या, बॉंड लिहून घेणाऱ्या कंपन्या आता प्रोजेक्ट पुरतेच कर्मचारी हवे आहेत. “हायर अँड फायर’पॉलिसीला आता वेगवेगळी गोंडस नावे देऊन अमलात आणले जात आहे.
काही बड्या आयटी कंपन्यांनी चांगले कर्मचारी मिळविण्यासाठी आणि तेही फक्त कामापुरते दोन ते तीन महिन्यांसाठी मिळावेत म्हणून इंटर्नशिपचे स्वरुपच बदलून टाकले आहे. गेल्या काही वर्षांपासून आयटीयन्स “हायर अँड फायर’ या पॉलिसीाला म्हणजे काम असेल तोपर्यंत कर्मचारी ठेवायचा आणि नंतर काढून टाकायचा या धोरणास तीव्र विरोध करत होते.
परंतु आता कंपन्यांनी याच पॉलिसीला इंटर्नशिपचे गोंडस नाव दिले आहे. अनेक बड्या कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी अर्ज मागविले आहेत. या इंटर्नशिपचा स्टायफंड 25 ते 35 हजार रुपये प्रति महिना असल्याने सध्या नोकरी नसलेल्या अनेकांनी दोन महिन्यांसाठी का होईना, ही नोकरी करण्याचे ठरविले आहे.
इंटर्नशिप ही शक्यतो नुकत्याच पास झालेल्या तरुणांसाठी असते; परंतु कंपनीने ही महत्त्वाची अट काढून कोणताही पदवीधर यासाठी अर्ज करु शकतो, असे सांगितले आहे. यातून वयाची अट देखील काढून टाकण्यात आली आहे. परंतु इंटर्नशिपसाठी कम्युनिकेशन स्किल्स, ऍनलेटिकल स्किल्स हवे असल्याची मागणी केली आहे.
अर्थात ज्यांना आयटी क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे परंतु सध्या बेरोजगार आहेत, अशा आयटीयन्सना कंपन्या केवळ दोन ते तीन महिने प्रोजेक्टपुरत्या वापरुन घेणार आहेत, असा आरोप आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी करत आहेत. तसेच या आर्थिक तिमाहीत आपण मनुष्यबळाची भरती केली हे देखील कंपन्या दाखवू शकतात. परंतु इंटर्न भरुन कर्मचाऱ्यांची जबाबदारी घेण्यास तयार नाहीत.
करोनाकाळानंतर आयटी क्षेत्रात खूप मोठी स्थित्यंतरे पहावयास मिळाली. कधी ऍट्रीशन रेट अर्थात कर्मचारी सोडून जाण्याचे प्रमाण बड्या बड्या कंपन्यांना धडकी भरविणारे होते. तर कधी कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यासाठी कंपन्यांनी वापरलेल्या युक्त्या कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकवत होत्या. चांगल्या कर्मचाऱ्यांनी आपल्याच कंपनीसोबत राहावे, यासाठी देखील करण्यात आलेले प्रयत्न चर्चेत होते. गेल्या दीड ते दोन वर्षांत परिस्थिती सातत्याने बदलत होती.
कधी कंपनी कर्मचारी सोडून जाऊ नये म्हणून प्रयत्न करत होत्या तर कधी बॅकग्राउंड व्हेरिफिकेशनच्या नावाखाली आयटीयन्सला घरचा रस्ता दाखवित होत्या. कधी आयटीयन्स आपल्या अटी-शर्तीवर नोकरी करत होते तर कधी नोकरी वाचविण्यासाठी प्रयत्नही करताना दिसले. आता पुन्हा एकदा परिस्थिती बदलली आहे. पाश्चात्य देशात वाहत असलेले मंदीचे वारे, बॅंकिंग क्षेत्रातील घडामोडींचा बसलेला फटका हे सर्व पाहता कंपन्या नवीन आणि लहान प्रोजेक्ट्ससाठी पगाराचा कायमस्वरुपी खर्च टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. इंटर्न भरती करुन काम चालविले जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!