Heat Stroke : जळगाव : देशभरात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यातील तापमानाचा पारा सुद्धा वर चढला आहे. त्यामुळे उष्माघाताच्या घटना राज्यभरातून समोर येताना दिसून येत आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातून समोर आली आहे. एका विवाहीत महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला. लग्न समारंभ आटोपून घरी जात असताना ही घटना घडली आहे. (Heat Stroke)
उष्माघाताचे हे पहिलेच प्रकरण
रुपाली गजेंद्रसिंग राजपूत (वय 33 वर्ष, तांबेपुरा ) असे या मृत महिलेचे नाव आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील जळगाव जिल्ह्यातील उष्माघाताचे हे पहिलेच प्रकरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली ह्या एका विवाह सोहळ्यासाठी विदर्भातील अमरावती येथे गेल्या होत्या. विवाह सोहळा आटोपून त्या गुरुवारी (11 मे) रोजी रेल्वेने परत आपल्या घरी अमळनेर येथे आल्या. दरम्यान त्यांना अचानक मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर रुपाली यांना त्यांच्या पतीने तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी उष्माघाताची लक्षणे असल्याचे सांगत औषध देऊन प्राथमिक उपचार करून रुपाली यांना घरी सोडले.
दरम्यान, काही काळ रुपाली यांना बरे वाटले मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यांना उलट्या मळमळ चक्कर सुरू झाले. त्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात घेऊन गेले मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेची नोंद अमळनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.