Chandrakant Patil : पुणे : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे; बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशके बाजारात येऊ नये यासाठी अशा प्रकरणात तातडीने गुन्हे दाखल करत कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. (Chandrakant Patil)
विधानभवन येथे बैठकीचे आयोजन
विधानभवन येथे आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, संजय जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विभागीय कृषि सहसंचालक रफिक नायकवडी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी अनिल देशमुख आदी उपस्थित होते.
अल निनोचा परिणाम पाहता खरीप हंगामात दुबार पेरणीची गरज भासल्यास बियाणे उपलब्धता राखीव ठेवावी असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, बियाणे, किटकनाशांच्या बाबतीत जिथे तक्रार येईल तिथे लगेच तपासणी, अहवाल करत गुन्हे दाखल करावेत. अशा प्रकरणात कठोर शिक्षा होईल यावर लक्ष द्यावे.
शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे. ऊस उत्पादकांना सूक्ष्म सिंचन संच बंधनकारक करण्यासाठी प्रयत्न करावेत. विविध कार्यकारी संस्थांना फवारणीसाठी अनुदानावर ड्रोन यंत्रे देता येतील. तेथून मागणीप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतावर फवारणी होऊ शकेल. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होण्याच्यादृष्टीने राज्याच्या महत्त्वाकांक्षी अशा सौरकृषि वाहिनी योजनेला गती द्यावी. या योजनेचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा, असेही पाटील म्हणाले.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पडीक जमिनीवर बांबू लागवडीचा उपक्रम चांगला असून त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धीद्वारे शेतकऱ्यांना महत्व पटवून द्या, असेही पालकमंत्री म्हणाले.
दरम्यान, यावेळी कृषिपंप वीजजोडणी, जिल्ह्यातील धरणप्रकल्पातील पाणीपरिस्थितीचाही आढावा घेण्यात आला. मार्च २०२३ अखेर कृषिपंपांच्या वीजजोडण्या प्राधान्याने पूर्ण करण्यात आल्या असून यावर्षात जिल्ह्यात १० हजार वीजजोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार वीजजोडासाठी अनामत रक्कम भरलेल्या शेतकऱ्यांना तीन महिन्याच्या आता वीजजोडणी द्यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Chandrakant Patil : उद्योजक होण्यासाठी दलीत तरुणांच्या पाठीशी उभे राहू चंद्रकांत पाटील