Pune News | पुणे : हिंजवडी मध्ये महिलेने एक वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास टोळक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
जुन्नर तालुक्यातील अजनावळे येथे आदिवासी महोत्सवानिमित्त लोकनाट्य तमाशाच्या कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान बंदोबस्तावर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यास 20 ते 25 जणांच्या जमावाने लाथा बुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण केली. कार्यक्रमात काही तरुण गोंधळ करू लागल्याने पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना खाली बसा असे म्हटले त्यावरुन जमावाने ही मारहाण केली.
तौफिक शेख असे मारहाण केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीसांनी या प्रकरणी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला आहे. तसेच एकास ताब्यात घेतले आहे.
शंकर डोळस, घनशाम लांडे, सूरज विरणक, तुषार लांडे, तुषार साबळे, संदीप घुटे, सचिन लांडे, गणपत घोटघर, बुदा वालकोळी, युवराज वालकोळी, वसंत लांडे, युवराज आढारी, निंबा मांगले, रोहित लांडे, रामदास लांडे, लालू ईदे, अशोक लांडे, सागर घोटघर, किरण लांडे, कुणाल कोदे तसेच इतर पाच ते सहा जण (सर्व जण रा. अजनावळे, ता. जुन्नर) यांच्या विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अजनावळे येथे आदिवासी महोत्सवानिमित्त लोकनाट्य तमाशाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी स्टेजच्या डाव्या बाजूकडील काही तरुण गोंधळ करू लागल्याने पोलिस कर्मचारी तौफिक शेख यांनी त्यांना खाली बसा असे सांगितले.
त्याचा राग आल्याने एका तरुणाने त्यांना शिवीगाळ करीत लाकडी काठीने मारहाण केली, त्या वेळी तेथील 20 ते 25 तरुणांनी शिवीगाळ तसेच दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान तेथील पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी त्यांना गर्दीतून बाहेर काढले.पुढील तपास पोलीस करत आहेत.