Madhya Pradesh |मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात खरगोन येथे सकाळी साडेआठ वाजता ५० फूट उंच पुलावरून नदीत बस कोसळून अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याची माहिती आली आहे. जखमी लोकांना खरगोनच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बसमध्ये ४० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात चालक, कंडक्टर आणि क्लिनरचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मंगळवारी सकाळी बस बोराड नदीच्या पुलावरून कोसळली. नदीत पाणी नसल्याने यात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. जखमींना खासगी वाहनांमधून स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बस शारदा ट्रॅव्हल्सची असून खरगोनहून इंदौरला जात होती. ही दुर्घटना खरगोन ठिकरी मार्गावर झाली. बस नदीच्या पुलावरून जात होती. तेव्हा नियंत्रण सुटून रेलिंगवर आदळली. रेलिंग तोडून बस नदीत कोसळली. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी खरगोन येथे झालेल्या बस दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला. घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.