Swadhar Yojana पुणे : डाॅ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर (स्वाधार योजना) (Swadhar Yojana ) योजनेच्या लाभापासून मागासवर्गिय विद्यार्थी वंचित आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या योजनेचा लाभ मिळाला नसल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकरला आहे. अनेकवेळा आंदोलन करुनही प्रशासनाने जाणिवपूर्वक विद्यार्थ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांना जनहित संघर्ष सेनेने पाठिंबा दिला आहे.
विद्यार्थ्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या…!
जनहित संघर्ष सेनेच्या वतीने स्वाधार योजने साठी आंदोलक विद्यार्थ्यांना आंदोलन स्थळी भेट देण्यात आली. यावेळी सेनेचे संस्थापक सोमनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या.
समाजकल्याण प्रशासनाने एकही स्वाधारचा हप्ता दिला नाही. असंख्य विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या प्रलंबित आहेत. त्यामुळे आर्थिक खर्च कसा भागवावा, हा मोठा प्रश्न असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले. तसेच लवकरात लवकर योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, अशा इशारा शिंदे यांनी यावेळी दिला.
अनुसूचित जाती मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर प्रशासनाकडून जाणिवपूर्वक अन्याय केला जात आहे. येथून पुढे जर असच होत राहिल तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यावे, याचा जाब प्रशासनाला आणि सरकारला विचारणार असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले.
डाॅ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना दिला जातो. विद्यार्थ्यांना घर, राहणे आणि इतर खर्चासाठी शासनाकडून दरवर्षी 51 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.