Pune Crime पुणे : दारू पित बसलेल्या टोळक्याला हटकल्याच्या किरकोळ कारणावरून टोळक्याने एकावर कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना रविवारी दुपारी साडे तीन वाजता केशवनगर येथे घडली आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरातील स्थानिक दुकानदारांनी दुकाने बंद करून या घटनेचा निषेध केला आहे.
रवींद्र दिगंबर गायकवाड (वय ५९, रा. केशवनगर, मुंढवा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांनी अटक केली आहे. आकाश जावळे (वय-१९), सागर जावळे (वय-२२) व साहिल सुतार (वय-१९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
गायकवाड यांचे केशवनगर येथील श्रीकृपा सोसायटीत घर आहे. तेथेच गाई – म्हशींचा गोठा आहे. रविवारी गायकवाड यांच्या गोठ्याजवळ काही तरुण अंमली पदार्थाची नशा करीत बसले होते. त्यावेळी गायकवाड यांनी त्यांना संबंधित ठिकाणी नशापाणी का करता ? अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने टोळक्याने त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर ते निघून गेले. काही वेळाने पुन्हा संबंधित तरुण हातामध्ये कोयते घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुन्हा गायकवाड यांना शिवीगाळ करीत त्यांच्यावर कोयत्याने वार केले.
दरम्यान, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या गायकवाड यांना त्यांच्या नातेवाईकांनी तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच गायकवाड यांचा मृत्यू झाला. तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.