सुरेश घाडगे
Election परंडा : परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्याElection १८ जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या दुरंगी लढतीत शिवसेना (ठाकरे गट) , राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी या महाविकास आघाडीच्या माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील व माजी आमदार राहूल मोटे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी महाविकास पॅनलने १३ जागांवर दणदणीत विजय मिळवत शिवसेना, भाजपा, रिपाईं या महायुतीच्या आरोग्य कुटूंब कल्याण मंत्री पालकमंत्री प्रा . डॉ . तानाजीराव सावंत, माजी आमदार सुजितसिंह ठाकुर व रिपाईं प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ शेतकरी विकास पॅनलचा दारूण पराभव केला. त्यांना ५ जागांवर विजय मिळाला.
जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेल्या परंडा विविध कार्यकारी सोसायटीवर मोठा विजय मिळवल्यानंतर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी बाजार समिती काबीज करीत दुसरा मोठा विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक यांनी गुलाल उधळून फटाके फोडून जल्लोष साजरा केला .
शुक्रवारी (दि . २८ ) १८ जागांसाठी १ हजार ३९७ पैकी १ हजार ३७९ मतदान झाले. परंडा तहसिल कार्यालय येथे शनिवारी ( दि . २९ ) सकाळी ९ वाजता मतमोजणी सुरु झाली. सर्वप्रथम ग्रामपंचायत मतदार संघातील मतमोजणी झाली. यामध्ये महायुतीचे सर्व ४ उमेदवार विजयी झाले. विजयी सलामी दिल्याने महायुतीच्या समर्थकांनी जल्लोष केला. त्यानंतर सोसायटी मतदार संघातील मतमोजणी झाली. यामध्ये महाविकास आघाडी चे सर्व ११ उमेदवार विजयी झाले व सत्ता महाविकास आघाडीची हे स्पष्ट झाले .
त्यानंतर व्यापारी मतदार संघातील २ जागा महाविकास आघाडीनेच मिळवल्या. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास निर्विवाद स्पष्ट बहुमत आल्याने समर्थकांनी मोठा जल्लोष केला. तर हमाल मापाडी मतदार संघातील १ एकमेव असलेली जागा महायुतीने मिळवली. त्यामुळे या बाजार समितीत महाविकास आघाडी १३ तर महायुती ५ असे संख्या बळ झाले आहे.
या निवडणुकीतील विजयामुळे महाविकास आघाडीचे मनोबल वाढले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तथा नगर परिषद , पंचायत समिती व जिल्हा परिषद या निवडणुका मोटे – पाटील महाआघाडीच्या माध्यमातून लढण्यासाठी सज्ज रहातील. तर या पराभावामुळे सावंत व माजी आमदार ठाकूर यांच्यासह पदाधिकारी व आयाराम पदाधिकारी यांना आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. परंडा सोसायटी व बाजार समिती या दोन्ही महत्वाच्या संस्था केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या पक्षांना गमवाव्या लागल्या आहेत.
विजयी उमेदवार..!
सोसायटी मतदारसंघ ११ उमेदवार महाविकास आघाडीचे विजयी – दादा घोगरे, डॉ . रविंद्र जगताप, शंकर जाधव, जयकुमार जैन, हरी नलवडे, संजय पवार, सोमनाथ सिरसट, रतनबाई देशमुख, सविता मिस्कीन, सुरेश शिंदे व अॅड. सुजित देवकते.
*ग्रामपंचायत ४ ही जागा महायुती विजयी – राहूल डोके, अरविंद रगडे, विजयकुमार बनसोडे, महादेव बारसकर विजयी
*व्यापारी मतदार संघ २ ही जागा महविकास आघाडी विजयी – अनिकेत काशीद व जावेद
बागवान विजयी झाले.
*हमाल मापाडी मतदार संघ १ जागा महायुती विजयी – परमेश्वर मिठाळे हे विजयी झाले .
यांचा झाला पराभव
ग्रामपंचायत मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अॅड . संदीप पाटील , आनाळा ग्रामपंचायत चे माजी सरपंच दत्तात्रय पाटील, प्रदीप पाटील व नवनाथ ओव्हाळ या सर्व ४ ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला. तर वि.का.से.सो. सर्वसाधारण मतदार संघात महायुतीच्या सर्व ११ उमेदवारांचा दारुण पराभव झाला.
यामध्ये सोमनाथ अनवणे, अशोक कदम, अॅड .रणजित खरसडे, प्रविण चोबे, साहेबराव पाडुळे, प्रभाकर लिमकर, सुरेश साठे, संगीता नवले, सुनंदा पाटील, नागेश शिंदे , भिमा पवार यांचा पराभव झाला. तसेच व्यापारी मतदार संघातील महायतीचे उमेदवार सुभाष खराडे व गौसपाशा नियामत भैरे यांचा पराभव झाला. तर हमाल मापाडी मतदार संघातील महाविकास आघाडी चे रमेश यादव यांचा पराभव झाला आहे.