लोणी काळभोर, (पुणे) : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने हवेली तालुक्याच्या शिक्षण विभागामार्फत संपूर्ण तालुक्यात विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन पंचायत समिती हवेलीचे गटशिक्षण अधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी केले.
सोरतापवाडी (ता. हवेली) येथील येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयात भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यानिमित्ताने शुक्रवारी (ता. ०५) तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी व संस्थेचे सेक्रेटरी रंगनाथ कड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेसाहेब लोंढे बोलत होते.
या स्पर्धांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, प्रश्नमंजुषा, निबंध लेखन, चित्रकला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेसाठी शाळा स्तर ते बीट स्तरापर्यंत स्पर्धा घेऊन प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना तालुकास्तरावर स्पर्धांसाठी बोलवण्यात आले होते. या स्पर्धेसाठी हवेली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील १५० विद्यार्थांनी सहभाग घेतला होता.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी भरत इंदलकर, रंजना कड, शब्बीर शेख, हवेली प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश कुंजीर, केंद्रप्रमुख महेंद्र मोरे, अद्वेत सर, बडे सर, वाजे सर, भालचिम सर आदी उपस्थित होते. पुरोगामी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पडवळ यांनी मोलाचे सहकार्य केले. पंचायत समिती हवेली येथील विषयतज्ञ परकाळे मॅडम, क्षीरसागर मॅडम, बबीता चव्हाण, सुवर्णा पुंडे, सारिका भोंडवे तसेच बाळू चव्हाण हे देखील नियोजनात सहभागी होते.
यापुढे बोलताना लोंढे म्हणाले, “उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात १० हजार विद्यार्थ्यांचे समूह गायन, लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल येथे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच हवेलीतील लोणीकंद, देहू, खेड शिवापूर, वाघोली, या विभागात देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तालुकास्तरीय शालेय स्पर्धा उत्साही वातावरणात पार पडल्या, स्पर्धेत क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले व जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या नियोजनात नंदकुमार शिंदे, स्वाती चौधरी, उज्वला नांदखिले, गायकवाड सर, माने सर, भागवत सर, यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दुर्गा देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार भरत इंदलकर यांनी केले.