Navale Bridge Accident पुणे : मुंबई-बंगळूरु महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. हा महामार्ग मृत्यूचा सापळाच बनलेला आहे. त्यामुळे कायम स्वरुपी उपाय योजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नुकताच स्वामी नारायण मंदिराजवळ झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने घटनेचा अभ्यास करुन सात दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
डॉ. देशमुख यांनी दिली माहिती…!
या समितीमध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता सदस्य तर, प्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य सचिव असतील. अपघात कमी करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यात याव्यात. या ठिकाणांच्या अपघातांबाबत ‘सेव्ह लाईफ फाउंडेशन संस्थेने केलेल्या उपाययोजनांचा अहवालात अंतर्भाव असावा, असे डॉ. देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे.
रस्ते सुरक्षा समितीच्या माध्यमातून नवले पुलाजवळ होत असलेल्या अपघातांबाबत आढावा घेण्यात आलेला आहे. येथे होणाऱ्या अपघाताची कारणे व त्याअनुषंगाने उपाययोजना सुचविण्याबाबत ‘सेव्ह लाईफ फाउंडेशन या संस्थेला काम दिले होते. असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
या संस्थेने दिलेल्या अहवालाच्या आधारे बऱ्याच ठिकाणी स्ट्रिप्स लावणे, रस्त्यांच्या बाजूचे अतिक्रमण काढणे, पोलिसांचा बंदोबस्त वाढवणे, वेग मर्यादेवर नियंत्रण आदी उपाययोजना केल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालाही कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. डॉ. देशमुख यांनी ससून रुग्णालयात जखमींची भेट घेतली.