Pune | पुणे : संगीतकार आनंदजी( कल्याणजी आनंदजी) यांच्या स्वरांच्या जादूने आज कारागृहातल्या निर्जीव भिंती सुद्धा रोमांचित आणि पुलकीत झाल्य. निमित्त होते आनंदजी यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र कारागृह प्रशासन,भोई प्रतिष्ठान व आदर्श मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रेरणापथ या प्रकल्पांतर्गत आयोजित स्वर मैफिलीचे. आनंदजी नावाच्या जगप्रसिद्ध संगीतकाराची जादू काय आहे हे बंदी बांधवांनी याची देही याची डोळा अनुभवले.
‘और इस दिल में क्या रखा है’, समझोता गमो से करलो, यारी है ईमान मेरा…यार मेरी जिंदगी………..अशी एकाहून एक अवीट गाणी आनंदजींनी सादर करताच बंदीजनासोबत कारागृहातील अधिकाऱ्यांना सुद्धा गहीवरून आले.
याप्रसंगी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृह अधीक्षक राणी भोसले, प्रा.चंद्रमणी इंदुरकर ,वरिष्ठ तुरुंगाधिकारी शिवशंकर पाटील, नागेश पाटील, अनिल खामकर , रवींद्र गायकवाड, अंगद गव्हाणे गुरूजी,आदर्श मंडळाचे उदय जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
येरवडा कारागृहातील रेडिओच्या माध्यमातून सर्व बंदी जनांशी संवाद…
या स्वरमैफिलीत सुप्रसिद्ध गायक संजय टंडन ,वादक जाहीर दरबार, मनोज रणधीर या कलाकारांनी साथ दिली. आनंदजीच्या गाण्यानी प्रेरित होऊन बंदी बांधवांनी सुद्धा आपली गाणी आणि शेरोशायरी पेश केल्यावर या जगप्रसिद्ध संगीतकाराने त्यांना उभे राहून दाद दिली. या निमित्ताने आनंदजी यांनी येरवडा कारागृहातील रेडिओच्या माध्यमातून सर्व बंदी जनांशी संवाद साधला.
कार्यक्रमाचे संयोजक भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रेरणापथ प्रकल्पाचे समन्वयक डॉ. मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाचे आयोजना मागची भूमिका स्पष्ट करताना बंदी बांधवांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून अशा उपक्रमांचा फायदा त्यांच्या पुनर्वसनासाठी होत असल्याची माहिती दिली.
कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी आनंदजीं सारख्या जगप्रसिद्ध संगीतकाराच्या स्नेहसंवादाने बंदीजनांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा स्फूर्तिदायक भावना निर्माण होण्यास निश्चितच मदत झाली असल्याचे सांगून आनंदजींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
येथील प्रतिसादाने भारावून जाऊन आनंदजी यांनी लवकरच त्यांच्या माध्यमातून महिला कारागृह, खुले कारागृह व मध्यवर्ती कारागृह येथील सर्व बंदी बांधवांसाठी मोठ्या प्रमाणावर कल्याणजी आनंदजी यांच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगतले.
आदर्श मंडळाचे उदय जगताप यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी येरवडा कारागृह प्रशासन, गव्हाणे गुरूजी, साजिद मिरजकर यांनी विशेष परिश्रम घेतले.