पुणे : गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून पाचजणांनी एकाचा खून केल्याची घटना कोंढवा येथील शिवनेरीनगर परिसरात बुधवारी (ता. ०३) घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
महेश लक्ष्मण गुजर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अमर कैलास गव्हाणे (वय ३४), राजकुमार लक्ष्मण पवार (वय २९), कृष्णा गणेश मराठे (वय ३१), सचिन विष्णू राठोड (वय २२), गणेश राजाराम हाके (वय ४६ सर्व रा. सर्वजण कोंढवा खुर्द) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी सोनी गुजर (वय २१) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी गुजर व वरील सर्व आरोपी हे शिवनेरीनगर परिसरात राहायला आहेत. काही दिवसांपूर्वी महेशच्या गाडीचा धक्का आरोपी अमरला लागला होता. त्याच रागातून टोळक्याने बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास महेशवर धारदार शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी करीत त्याचा खून केला. कोंढवा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींना अटक केली. तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.