Politics | पुणे : गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. अशातच अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना आपण राष्ट्रवादीच राहणार कुठेही जाणार नसून ह्या सर्व अफवा आहेत असे सांगितले.
यावेळी पवार यांनी मित्र पक्षातील नेते संजय राऊत यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यानंतर मात्र राऊत पवार यांच्यात चांगलीत हमरीतुमर बघायला मिळाली. दरम्यान आज पुण्यात पत्रकारांनी पुन्हा अजित पवार यांना संजय राऊतांबाबत विचारणा केली असता पुन्हा एकदा पवार यांचा रुद्र अवतार बघावयास मिळाला. यावेळी कोण संजय राऊत ? असा उलट प्रश्न पवार यांनी पत्रकारांना केला.
महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. मात्र अजित पवार व संजय राऊत यांच्यात सुरु असलेल्या वादामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
तेव्हा तुम्ही सांगितल्यानंतरही संजय राऊत हे सल्ले देत आहेत, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी कोण संजय राऊत ? म्हणत राऊतांवर हल्लाबोल केला आहे.
अजित पवार म्हणाले, “मी कुणाचं नाव घेतलं नव्हतं. कुणी अंगाला का लावून घ्यावं, मी माझ्या पक्षासंदर्भात बोललो होतो.” असे सणसणीत टोला अजित पवारांनी राऊतांना लगावला.
संजय राऊत यांनी रोखठोकमधून शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फुटीच्या मार्गावर असल्याचे भाष्य केले होते. त्याला अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले होते. राऊतांचे नाव न घेता आमच्या पक्षाची बाजू मांडण्याचा तुम्हाला कोणी वकील पत्र दिले आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर राऊतांनी अजित पवारांना सुनावलं होतं.
ते म्हणाले, ‘मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, मी अजित पवारांचे का ऐकून घेऊ, माझ्यासाठी शरद पवारांची भूमिका महत्वाची आहे. मी फक्त शरद पवार यांचेच ऐकतो,” “शिवसेना फुटली तेव्हा मी आमचीच वकील केली,” अशा शब्दात संजय राऊतांनी अजित पवारांना सुनावले होते.
दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या टीकेनंतर संजय राऊत काय भाष्य करणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.