Election लोणी काळभोर : पुणे जिल्ह्यातील हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील Election ३ माजी सभापती व एक माजी संचालक यांचे उमेदवारी अर्ज मंजूर करण्याचा निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांचा निर्णय पणन संचालकांनी योग्य ठरविला आहे.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल”चे उमेदवार बाजार समितीचे माजी सभापती दिलीप काळभोर, प्रकाश जगताप, रोहिदास उंद्रे व माजी संचालक राजाराम कांचन यांचे उमेदवारी अर्ज छानणी दरम्यान अधिकारी प्रकाश जगताप यांनी मंजूर केले होते. त्या विरोधात चंद्रकांत वारघडे यांनी पणन सहसंचालकाकडे अपील केले होते. या अपिलावर मंगळवारी (ता. १८) सुनावणी झाली.
“अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल”ला दिलासा…!
या सुनावणीत वरील चौघांचे उमेदवारी अर्ज अपात्र करण्याचे चंद्रकांत वारघडे यांचे अपील पणन सहसंचालक अविनाश देशमुख यांनी नामंजूर केले. त्यामुळे वरील चारही उमेदवार व “अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल”ला दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, तत्कालीन बाजार समितीत झालेला आर्थिक तोटा व चौकशी अहवालानुसारची रक्कम या चारही उमेदवारांनी भरली नसल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज नामंजूर करण्याची मागणी अपिलात करण्यात आली होती.
संबंधित चार उमेदवारांनी मुख्यमंत्री तथा पणनमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अपील दाखल केले आहे. याप्रकरणी देण्यात आलेली अंतरिम स्थगिती मुख्यमंत्र्यांसमोर होणाऱ्या पुढील ४ मे २०२३ पर्यंतच्या सुनावणी पर्यंत कायम आहे. त्यामुळे पणन सहसंचालकांनी वारघडे यांचे अपील नामंजूर करण्याचा निर्णय दिला आहे.