IPL Fixing News पुणे : भारताचा वेगवान गोलंदाज आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणाऱ्या मोहम्मद सिराजला फिक्सिंगसाठी मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळं आता क्रिकेट जगतात खळबळ उडाली असून या प्रकरणाची माहिती खुद्द सिराजने बीसीसीआयला दिली आहे.
आरोपीने मेसेज करून मोहम्मद सिराजला संघाची माहिती मागवली होती, त्याबदल्यात सिराजला मोठी ऑफर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळं आता यंदाचा आयपीएल सुरू होऊन काही दिवसच झालेले असतानाच धक्कदायक घटना समोर आल्यामुळं खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
भारताचा वेगवान गोलंदाज आणि आरसीबीचा मुख्य गोलंदाज मोहम्मद सिराजला चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी मोबाईलवर संघाची माहिती विचारणारा मेसेज आला आहे. संबंधित आरोपीने फिक्सिंगसाठी त्याच्याशी संपर्क केल्याचा दावा खुद्द सिराजने केला आहे. संघाची आणि सामन्याची माहिती देण्याच्या मोबदल्यात सिराजला मोठी रक्कम देण्याची ऑफर आरोपीने मेसेजमध्ये केली आहे. त्यानंतर मोहम्मद सिराजने या प्रकरणाची माहिती तातडीनं बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला दिली.
बीसीसीआयने या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन सूत्र हलवले. त्यानंतर पोलिसांनी सिराजला फिक्सिंगची ऑफर देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. सिराजला फिक्सिंगची ऑफर देणारा आरोपी हा सट्टेबाज नसून सट्टा लावणारी व्यक्ती आहे.
दरम्यान, आरोपी हैदराबाद येथे ड्रायव्हर म्हणून काम करतो. काही दिवसांपूर्वीच त्याने सट्टेबाजीत मोठी रक्कम गमावली होती. त्यानंतर त्यांनी आरसीबी आणि सीएसकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी आतील माहिती जाणून घेण्यासाठी मोहम्मद सिराजला मेसेज केल्याचं तपासातून उघड झालं आहे.