राहुलकुमार अवचट
Yavat Crime यवत (दौंड) : घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे. या चोरट्यास यवत पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. 21 वर्षीय या गुन्हेगाराने तब्बल 18 पेक्षा जास्त गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले. दरम्यान हा आकडा वाढण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे. एवढ्या कमी वयात इतके गुन्हे बघून सर्वांच्याच बुवया उंचावल्या आहेत.
हड्ड्या उर्फ रवी उर्फ शंकर मधुकर पवार (वय २१ रा.पेनूर ता मोहोळ जि. सोलापूर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
हड्ड्या हा रविवारी (दि. १६) रोजी पहाटे दिडच्या सुमारास दौंड तालुक्यातील वरवंड गावच्या हद्दित रात्रीचे वेळी चोरी अथवा घरफोडी करण्याचे उद्देशाने फिरत होता. त्यावेळी तो यवत गुन्हे शाखेच्या पथकाला दिसून आला असता त्यास ताब्यात घेतले. हड्ड्या पवार वाहन चोरी, घरफोडी असे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीतील सदस्य असून याच्यावर अनेक ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण,अहमदनगर, पुणे शहर, लोणावळा शहर, पिंपरी चिंचवड, पंढरपूर शहर, यासह कर्नाटक राज्यातील आळंद व गाणगापूर येथे देखील त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.