Pune Crime News | पुणे : वर्गणी दिली नाही म्हणून मोबाईलशॉपी चालकाला मारहाण करणार्या चौघांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये दोघा सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.
अमान इब्रहीम खान (वय – २१), हमजा तसवर शेख (वय – १९), हाफीज ऊर्फ हुजेफा इसाक शेख (वय – २१), मोहंम्मद वसीम खान (वय १९, सर्व रा. सत्तार चाळ, नाना पेठ) अशी चौघांची नावे आहेत.
याप्रकरणी, २४ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांच्या विरुद्ध मारहाण, खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास रास्ता पेठेत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
फिर्यादी व त्यांचे बंधू मोबाईलशॉपीत होते. त्या वेळी त्यांचे ओळखीचे चौघे आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादींना ’ईद मनाने को गोवा जाने का है, उसके लिए चंदा दो, नहीं दिया तो तुम्हारा मुँह फोड के दुकान भी फोड देंगे’ असे म्हणून वर्गणी वजा खंडणीची मागणी केली.
त्याला फिर्यादींनी नकार दिला. त्या वेळी हमजा व अमन या दोघांनी काठी व लोखंडी पान्ह्याने फिर्यादींच्या डोके आणि हातावर मारहाण करून गंभीर जखमी केले. खंडणीचा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी समर्थ पोलिसात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे यांनी दोन तासांच्या आत खंडणीखोरांना बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अशाप्रकारे कोणी वर्गणीची मागणी केली, तर त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांनी केले आहे.