हनुमंत चिकणे
Loni Kalbhor | लोणी काळभोर, (पुणे) : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरातून रविवारी (ता. 16) मध्यरात्री दीड वाजनेच्या सुमारास तीन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार लोणी काळभोर पोलिसांना मिळाली. तक्रार मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी आठ तासाहुन अधिक काळ मुले शोधण्यासाठी केलेली अथक धावपळ सकाळी साडेआठ वाजनेच्या सुमारास कामाला आली.
लोणी स्टेशन परीसातुन गायब झालेली तीनही मुले अखेर कॅम्प परिसरात एका ठिकाणी आढळुन आली. मुले समोर दिसताच, वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, प्रमोद हंबीर व त्यांच्या सहकारी पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
जास्मिन सलीम शेख (वय ०९), फातिमा सलीम शेख (वय – ०६), रेहमान सलीम शेख (वय ०५) अशी सापडलेल्या तीन मुलांची नावे आहेत.
ही तीनही मुले लोणीस्टेशन परीसरात आपल्या आईवडीलांसह राहतात. आईवडील भिक मागुन आपली उपजिवीका चालवतात. रविवारी तीनही मुलांना घरी सोडुन आई-वडील पुण्यात उपजिवेकेसाठी गेले होते. रात्री दहा वाजनेच्या सुमारास आई-वडील घरी आले असता, तीनही मुले घरातुन गायब असल्याचे लक्षात आले.
आई-वडीलांनी मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुले सापडत नसल्याचे लक्षात येताच, वरील तीन मुलांच्या पालकांनी रविवारी मध्यरात्री दिड वाजनेच्या सुमारास पोलिसात धाव घेतली. पोलिसांनीही तात्काळ वरील घटनेची दखल घेत वरील तीन मुलांचा शोध घेण्यासाठी धावपळ सुरु केली.
२० व त्यापेक्षा जास्त सीसीटीव्हीची पाहणी…
दरम्यान लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर परिसरात लोणी स्टेशन परिसरातून तीन मुले गायब झाल्याची माहिती सोमवारी (ता. १७) सकाळी सहा वाजल्यापासून वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र पोलीसांनी त्यापुर्वीच पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे व त्यांच्या पथकाने मुलांचा शोध घराच्या आजूबाजूच्या परिसरात तसेच रेल्वे स्टेशन, स्टेशन परिसारत घेण्यास सुरुवात केली. मात्र मुले कुठेच सापडत नसल्याने पोलिसांनी परिसरात असलेले २० व त्यापेक्षा जास्त सीसीटीव्हीची पाहणी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काही दुकाने सकाळी बंद असल्याने शोध घेण्यास अडचणी येऊ लागल्या. मात्र पोलिसांनी सदर दुकानदारांना फोन करून दुकान उघडायला सांगून शोधाशोध सुरू ठेवली.
पोलिसांचे पथक थेट कॅम्प परिसरात..!
लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर यांना माहिती मिळाली कि रमजान असल्याने मुलांना त्या ठिकाणी कपडे वाटण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी हि मुले गेली आहेत. त्यानुसार उपनिरीक्षक हंबीर, पोलीस शिपाई अजिंक्य जोजारे व त्यांचे एक पथक कॅम्प परिसरात मुलांच्या आई वडिलांना गाडीत बसवून घेऊन गेले.
कॅम्प परिसरात शोधाशोध करण्यास सुरुवात केली. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी विविध ठिकाणाची महिती घेतली. त्यानुसार एका व्यक्तीने फोटोतील तीनही मुले एका ठिकाणी झाडाखाली बसल्याचे सांगीतले. यावर पोलिसांनी सदर जागेवर जाऊन पाहिले असता, तीनही मुले सुखरुप आढळुन आली. यावर पोलिसांनी मुलांना गाडीत घालुन पोलिस ठाण्यात आणले व जुजबी चौकशी नंतर पालकांच्या स्वाधीन केले.
सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, प्रमोद हंबीर, पोलीस शिपाई अजिंक्य जोजारे, शैलेश कुदळे, दीपक सोनवणे प्रशांत सुतार, योगेश पाटील, विश्रांती फणसे यांनी केली आहे.
मुले गायब झाल्याची माहिती मिळाल्यापासुन, ते थेट मुले पालकांच्या ताब्यात करेपर्यंत लोणी काळभोर पोलिसांची धावपळ पाहुन, नागरिकांनी लोणी काळभोर पोलिसांच्या या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे.