विशाल कदम
Pune | शिरूर : जिल्हा परीषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी तुरुगातुन बाहेर पडताच, आबाराजे मांढरे यांच्या मदतीने जिजामाता महिला सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार अशोक पवार यांना धोबी पछाड दिला आहे.
पुण्यातील जिजामाता सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बांदल व मांढरे यांच्या राजमाता जिजाऊ पॅनेलने संचालक मंडळांच्या तेराच्या तेरा जागा जिंकुन, सहकारात बाजी मारली आहे. तर या निवडणुकीचा निकाल हा आमदार अशोक पवार व त्यांच्या पत्नी व जिल्हा परीषदेच्या माजी सभापती सुजाता पवार यांना धक्का देणारा ठरला आहे.
जिजामाता महिला सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यापासून आमदार अशोक पवार यांनी सर्व सूत्र स्वतः च्या हाती घेतली होती. तर मंगलदास बांदल यांनी स्वतःच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल करुन, आमदार पवार यांना निवडणुकीच्या सुरुवातीलाच इशारा दिला होता.
मंगलदास बांदल यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल होताच, निवडणुकीत धांदल होऊ नये यासाठी आमदार पवार आणि पत्नी सुजाता पवार यांनी अधिकच या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले होते.
काकासाहेब खळदकर यांच्याशी आमदार पवार यांची हातमिळवणी…
बांदल यांचा पराभव करण्यासाठी वेळप्रसंगी नेहमीच विरोधकाची भूमिका प्रामाणिकपणे निभावणाऱ्या काकासाहेब खळदकर यांच्याशी आमदार पवार यांनी हातमिळवणी केली. तर दुसरीकडे एकमेकांचे राजकीय कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे मंगलदास बांदल आणि आबाराजे मांढरे यांच्यात समेट घडवत बँकेशी संलग्न असलेल्या जाकीरखान पठाण, संतोष शितोळे, शरद कालेवर यांची मोट बांधून बांदल यांनी त्यांच्या पध्दतीने धांदल उडवुन दिली होती.
निवडणुकीच्या सुरुवातीपासुनच शेखर पांचूंदकर, मंगलदास बांदल, आबाराजे मांढरे यांनी वातावरण निर्माण केले होते . शिरुर तालुक्यातील अनेक बड्या नेत्यांची फौज आमदार अशोक पवार यांच्या बाजूने असतानाही या निवडणुकीत मात्र पवारांचा करिष्मा चालला नाही.
जिजामाता महिला सहकारी बँक निवडणुकीच्या निमित्ताने राजमाता पॅनेलचे नेतृत्व करणाऱ्या आमदार अशोक पवार आणि राजमाता जिजाऊ पॅनेलचे नेतृत्व करणाऱ्या शेखर पांचूंदकर यांच्यासह मंगलदास बांदल यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र या निवडणुकीत पांचूंदकर, बांदल, मांढरे यांच्या राजमाता जिजाऊ पॅनेलने १३ विरुद्ध ० अशी एकहाती सत्ता प्रस्तापित केली आहे.
नवनिर्वाचित संचालकांची नावे पुढीलप्रमाणे…
१)सुजाता जगताप (सर्वसाधारण महिला गट २५ किमी पुढील),२)प्रणिता पठारे, ३)मंगला भोजने, ४)रत्नमाला म्हस्के, ५)पुजा वांजळे, ६)सुनीता शितोळे, ७)सुरेखा शितोळे, ८)सुरेखा शेलार, ९)रेखा बांदल (सर्वसाधारण महिला गट २५ किमी पुढील), १०)धैर्यशील मांढरे (खुला गट), ११)अशोक काकडे (अनुसूचित जाती जमाती), १२)जाकिरखान पठाण (इतर मागास वर्ग) व १३)मनीषा कालेवार (विभुक्त जाती भटक्या जंमती विशेष मागास वर्ग)