पुणे : सततच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे सर्व प्रशासकीय बैठका आणि दौरे रद्द करण्यात आले आहेत. राज्यात सुरू असलेले पाहणी दौरे आणि बैठका यामुळे त्यांना थकवा जाणवत असून डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला असल्यामुळे त्यांच्या आजच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांचे सतत दिल्ली दौरे सुरु आहेत. याशिवाय महाराष्ट्र दौरा, उद्धाटनाचे कार्यक्रम, सत्कार समारंभ, जाहीर सभा, बैठका यामध्ये एकनाथ शिंदे सतत व्यस्त आहेत.
दरम्यान, या सगळ्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला असून त्यांना थकवा जाणवू लागला आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.