Pune Crime पुणे : आम्ही अंधेरी पोलिस ठाण्यातून बोलत आहोत. तुमच्या नावाने एक पार्सल असून, ते मुंबईहून तैवान येथे पाठविले जाणार आहे. त्यामध्ये 140 ग्रॅम एमडी नावाचा अमली पदार्थ मिळून आला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामध्ये तुमचे नाव आहे. असे सांगून पुण्यातील एका आयटी अभियंता तरुणीला सायबर चोरट्यांनी तब्बल 25 लाख 61 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी, कोथरुड येथील 29 वर्षीय तरुणीने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 11 एप्रिल रोजी घडली आहे. त्यानुसार अपर्णा क्रिष्णा अय्यर, अजय कुमार बन्सल, भानसिंग राजपूत, पोलिस असल्याची बातवणी करणारे आणि बँक खातेधारक यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
फिर्यादी तरुणी या आयटी अभियंता आहेत. अंधेरी पोलिस ठाण्यातून पोलिस अधिकारी बोलत असल्याची बतावणी करत सायबर चोरट्यांनी तरुणीसोबत संपर्क साधला. तुमचे एक पार्सल मिळाले असून,ते मुंबईहून तैवान येथे पाठवले जाणार आहे. त्यात कपडयामध्ये अमली पदार्थ, काही पासपोर्ट व एमडी आहे. त्याच्यावर तुमचे नाव असून, तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असे सांगितले.
दरम्यान तरुणीने माझे असे कोणतेच पार्सल नाही असे सांगितले. त्यावेळी त्याने तरुणीच्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक सांगितल्यावर तिला धक्काच बसला. त्यावेळी तरुणीला खरोखरच आपल्या नावाचा कोणीतरी गैर वापर केला आहे असे वाटले. त्याच संधीचा फायदा घेत सायबर चोरट्यांनी त्यांचा ऑनलाईन जबाब घेण्याच्या बहाण्याने बँक खात्याची गोपनीय माहिती आरोपींनी घेतली.
त्यानंतर कोणीतरी तुमच्या खात्यावर ऑनलाईन पैसे पाठवत आहे असे सांगून बँक खाते पाहण्याच्या बहाण्याने त्यांना एक ट्रान्झेक्शन करण्यास भाग पाडले. त्यानंतर विविध कारणे सांगून वेळोवेळी त्यांच्याकडून आरोपींनी 25 लाख 61 हजार 995 रुपये आपल्या खात्यात वर्ग करून घेतले. त्यानंतर फिर्यादींनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक घाडगे करीत आहेत.