लोणी काळभोर, (पुणे) : पुणे शहर, ग्रामीण तसेच आंतरजिल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रोख रक्कम, सोन्या- चांदीचे दागिने व मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण ग्रामीण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संतोष कोनीराम मोहिते ( वय २८, रा. जेवीएल कंपनीचे मागे, रांजणगाव एमआयडीसी ता शिरूर, मुळ रा. डोंगरकडा, ता. अधीपूर जि नांदेड), विकी शिवाजी जाधव, वय २४, मुळ रा. डोंगरतळ ता जिंतूर जि परभणी), गणेश ऊर्फ लहू रामभाऊ चव्हाण, वय २८, जुना टोल नाका, रांजणगाव गणपती ता. शिरूर, मुळ रा. मराठी शाळेजवळ, लहू जाधव याचे खोलीजवळ लोणीकंद, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या तीन अट्टल चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीची दुचाकी, सोने- चांदीचे दागिने, रोख रक्कम असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,
जबरी चोरीच्या गुन्हयात वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सूचना दिल्या होत्या. जबरी चोरीचे गुन्हयांचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या शिरूर विभागचे तपास पथकाने गुन्हयांचा समांतर तपास चालू केला होता.
सदर घटनेचा तपास करीत असताना एका खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली की, शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली दुचाकी ही जबरी चोरी करणारे सराईत चोर वापरत असून ते सर्वजण कोरेगाव भिमा परीसरात आहेत.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने शिक्रापूर चौकाजवळ हायवे रोडवर सापळा लावून पहाटे तीन सराईतांना ताब्यात घेतले. त्यांचेकडून चौकशी केली असता, त्यांनी दोन महिलांचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम चोरीचा गुन्हा केल्याचे सांगितले असून त्यांचेकडून गुन्हा करताना वापरलेली चोरलेली दुचाकी, मोबाईल तसेच सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण सुमारे दिड लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच आरोपींना शिक्रापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपीचे रेकॉर्ड पाहता त्यांचेवर वेगवेगळया जिल्हयातील पोलीस स्टेशनला दरोडा, जबरी चोरी, चोरीचे एकूण १४ गुन्हे दाखल असून आरोपींकडून नव्याने वरीलप्रमाणे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहायक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंदारे, पोलीस हवालदार विक्रम तापकीर, मंगेश थिगळे, राजू मोमीण, योगेश नागरगोजे, दगडु विरकर यांनी केली आहे.