(Pune) पुणे : रिक्षा चालकांची अरेरावी पुणेकरांना माहितीच आहे. त्यामुळे रिक्षा चालकांकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलत चालला आहे, असे म्हटले जाते. काही मोजक्या लोकांमुळे सगळ्यांना वाईट ठरवले जाते. मात्र खरे तर अनेकदा रिक्षा चालकांनीची माणूसकीचे दर्शन घडवले आहे. आता एका रिक्षा चालकाने दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे सगळीकडे कौतुक होत आहे.
सोन्याची चेन आणि ३० हजार रुपयांची रोख रक्कम….!
पुण्यातील भोर तालुक्यातून माणूसकी दाखवणारी घटना समोर आली आहे. रिक्षामध्ये प्रवासी बॅग विसरला. चालकाने बॅग उघडून बघितल्यावर आता एक तोळे सोन्याची चेन आणि ३० हजार रुपयांची रोख रक्कम होती. संबधित रिक्षाचालकाने प्रामाणिकपणा दाखवत त्या व्यक्तीचा शोध घेऊन बॅग परत केली आहे. या घटनेने जगात अजूनही माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे पहायला मिळाले.
गणेश शिवतरे असे या रिक्षा चालकाचे नाव असून ते भोर तालुक्यातील उत्रोली गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य असून ते शेतीचा व्यवसाय करून रिक्षा चालवण्यासाठी पुण्याला येतात. भोरवरून निघाल्यानंतर प्रवासी घेत घेत ते पुण्याला येतात. दिवसभर धंदा करुन रात्री घरी येतात. पुण्याला जाता येता चार पैसे मिळतील या आशेने रिक्षात प्रवाशी घेत असतात.
रविवार दि.९ रोजी नेहमीप्रमाणे ते पुण्याला जात असताना त्यांना नसरापूर चेलाडी येथे एक प्रवाशी भेटला. त्यानंतर शिवापूरला एक आणि शिंदेवाडी येथे एक असे तीन प्रवाशी घेतले. त्यांच्या रिक्षातील तिन्ही प्रवाशी पुण्यातील कात्रज येथे उतरले. त्यानंतर रिक्षाला ऑनलाईन हडपसरचे भाडे लागले. मात्र हडपसरकडे जात असताना कुणाची तरी बॅग रिक्षात राहिली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी ती बॅग त्या प्रवाशाला देता येईल या आशेने रिक्षाच्या डिकीत ठेवली.
भाडे करून झाल्यावर त्यांनी ती बॅग उघडुन पहिली तर त्यात एक डायरी, एक तोळ्याची चैन आणि तब्बल तीस हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली. डायरी वाचून पाहिली असता त्यात एक फोन नंबर मिळाला. त्यानंबरवर रिक्षाचालक शिवतारे यांनी फोन लावला असता समोर बोलणारी व्यक्ती दत्तात्रय इंगुळकर (रा.कामथडी ता.भोर) ही व्यक्ती पुणे शहरात कामानिमित्त गेली होती. त्यांना फोनद्वारे बॅग सुरक्षित असल्याचे शिवतरे यांनी सांगितले.
शिवतारे यांनी फोनवर संपर्क करून त्यांना त्यांची बॅग, बॅगेतील ३० हजाराची रोक रक्कम सह एक तोळ्याची चैन त्यांना परत केली. यावेळी इंगुळकर यांच्या बरोबर असलेल्या त्यांच्या वडिलांनी रिक्षाचालक गणेश शिवतरे यांच्याकडून प्रामाणिकपणाचे उदाहरण दाखवून दिल्याने त्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले. गणेश शिवतारे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.